बारदानांअभावी आठवडाभरापासून धान खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:54 IST2021-01-08T05:54:13+5:302021-01-08T05:54:13+5:30
लाखांदूर : यंदाच्या खरिपात केंद्र सरकार पुरस्कृत आधारभूत धान खरेदी केंद्रावर सरकारने पर्याप्त बारदाना उपलब्ध न केल्याने तालुक्यातील तीन ...

बारदानांअभावी आठवडाभरापासून धान खरेदी बंद
लाखांदूर : यंदाच्या खरिपात केंद्र सरकार पुरस्कृत आधारभूत धान खरेदी केंद्रावर सरकारने पर्याप्त बारदाना उपलब्ध न केल्याने तालुक्यातील तीन धान खरेदी केंद्र बारदानांअभावी आठवडाभरापासून बंद पडल्याची माहिती आहे. सदर खरेदी बंद पडल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांत कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरिपात शासनाच्या किमान आधारभूत किमत योजनेनुसार येथील खरेदी-विक्री सह.संस्थेंर्गत तालुक्यात एकूण आठ धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांतर्गत शासन नियमांनुसार नियमित शेतकऱ्यांच्या धानाची खरेदीदेखील सुरू आहे. मात्र, गत आठवडाभरापासून या संस्थेंतर्गत तालुक्यातील भागडी, डोकेसरांडी व पिंपळगाव /को. या तीन केंद्रांवर बरदानांअभावी धान खरेदी बंद पडल्याची ओरड आहे.
दरम्यान, यंदाच्या खरिपात तालुक्यात पूरपरिस्थिती, तुडतुडा व परतीच्या पावसाने लागवडीखालील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पीक उत्पादकता कमी आहे. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना अर्ध्या प्रमाणात उत्पन्न घेता आले. या परिस्थितीत या भागातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असताना उत्पादित धानाच्या विक्रीत बारदानांचा अभाव निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत प्रचंड रोष व्यक्त केल्या जात आहे.
याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन आठवडाभरापासून बंद पडलेली धान खरेदी पूर्ववत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांत केली जात आहे.