धान खरेदी केंद्रासाठी युतीचे आमदार सभागृहात गरजले
By Admin | Updated: June 10, 2014 23:51 IST2014-06-10T23:51:28+5:302014-06-10T23:51:28+5:30
जिल्ह्यातील बंद झालेले धान खरेदी केंद्र सुरु करा, या मागणीसाठी मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर अन्न पुरवठा मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आ.नरेंद्र भोंडेकर यांनी सभागृहात

धान खरेदी केंद्रासाठी युतीचे आमदार सभागृहात गरजले
भंडारा : जिल्ह्यातील बंद झालेले धान खरेदी केंद्र सुरु करा, या मागणीसाठी मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर अन्न पुरवठा मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आ.नरेंद्र भोंडेकर यांनी सभागृहात शासनाविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या.
यावर्षी शासनाने धान खरेदी केंद्र ३० जूनपर्यंत सुरू ठेवण्याचे परिपत्रक काढले. परंतु ८ मे २०१४ रोजी शासनाने दुसरे परिपत्रक काढून १५ मे २०१४ ला धान खरेदी केंद्र बंद करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे या प्रश्नावर आ.नरेंद्र भोंडेकर, आ.राजकुमार बडोले आ.खुशाल बोपचे, आ.देवेंद्र फडणवीस, आ.सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना लावली. धान खरेदीबद्दल ८ मे चे परिपत्रक रद्द करून ३० जूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरु ठेवण्याची विनंती सभागृहास आ.नरेंद्र भोंडेकर, आ.देवेंद्र फडणवीस, आ.खुशाल बोपचे, आ.राजकुमार बडोले यांनी विनंती केली असता मुख्यमंत्री व अन्न पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.
त्यानंतर सभागृह दोनदा बंद झाले. पुन्हा सभागृह सुरु करण्यात आले त्यावेळी धान खरेदी केंद्राचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हाही समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे घोषणा करीत आ.भोंडेकर व आ.बडोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ पोहोचले. त्यानंतर धान खरेदी केंद्र सुरु ठेवण्याबाबत उद्या (दि.११) रोजी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. उद्या सभागृहात धान खरेदी केंद्र ३० जूनपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले नाही तर या मागणीवर ठाम राहणार असल्याचे आ.भोंडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
धान खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे धान उत्पादक भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने जाणीवपूर्वक हे केंद्र बंद करुन शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत आहे, असा आरोपही आ.भोंडेकर यांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)