बारदानाअभावी तालुक्यातील धान खरेदी झाली ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST2021-03-25T04:33:43+5:302021-03-25T04:33:43+5:30
बिरसी फाटा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अखत्यारित विविध कार्यकारी सहकारी संस्था व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात शासकीय आधारभूत ...

बारदानाअभावी तालुक्यातील धान खरेदी झाली ठप्प
बिरसी फाटा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अखत्यारित विविध कार्यकारी सहकारी संस्था व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात शासकीय आधारभूत खरेदी केंद्राचा १ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला. धान खरेदी करण्याची संबंधित केंद्रचालकांना ३१ मार्चपर्यंतच प्रशासनाने मुदत दिली आहे. मात्र आतापर्यंत खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यात आली नसल्याने केंद्रावर धान पडून आहे. त्यात आता तिरोडा तालुक्यात बारदानाअभावी धान खरेदी रखडली आहे.
तिरोडा तालुक्यात १६ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ३१ हजार क्विंटल धान आधारभूत केंद्रावर विकले, तर कित्येक शेतकऱ्यांनी धान विक्री करण्यासाठी केंद्रावर आणला आहे. पण केंद्रावर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत धानाची भराई करण्यासाठी संबंधित केंद्रचालकांना बारदान उपलब्ध करून दिले नसल्याने त्याचा धान खरेदीवर परिणाम झाला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
हजारो क्विंटल धान केंद्रांवर बारदानाअभावी पडून आहे. पण याकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे दुर्लक्ष होत आहे. तर अवकाळी पावसाचा फटका उघड्यावरील धानाला बसण्याची शक्यता आहे. तर शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही बोनस देण्यात आला नाही. धान खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत असल्याने आता धान खरेदी करण्यासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पण केंद्रावर बारदानाच उपलब्ध नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त
बारदाना नसल्याने धान खरेदी बंद असतानाच आता अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचा धान पावसामुळे खराब होऊ नये, अशी चिंता सतावत आहे. शिवाय अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवरही त्याचा परिणाम होणार आहे.