चार हजार हेक्टरवरील धानपीक करपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:43 IST2018-10-07T21:41:39+5:302018-10-07T21:43:06+5:30
शेतकरी म्हंणजे नानाविध समस्यांचे बिऱ्हाड वाहून नेणारे साधन ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्यामुळे वरठी परिसरातील ४ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतपिक जवळपास करपले आहे. धानपिकाला शेवटचे पाणी वेळेवर दिले नाही आणि आत्ता पाणी दिले तरी पीक येणार नाही अशी परिस्थती निर्माण झाली आहे.

चार हजार हेक्टरवरील धानपीक करपले
तथागत मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : शेतकरी म्हंणजे नानाविध समस्यांचे बिऱ्हाड वाहून नेणारे साधन ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्यामुळे वरठी परिसरातील ४ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतपिक जवळपास करपले आहे. धानपिकाला शेवटचे पाणी वेळेवर दिले नाही आणि आत्ता पाणी दिले तरी पीक येणार नाही अशी परिस्थती निर्माण झाली आहे.
पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली असून १०० टक्के दुष्काळजन्य परिस्तिथी निर्माण झाली आहे. वरठी भागातील ४ हेक्टर शेतजमीन ही रामटेक व नागपूर येथील पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. हे क्षेत्र प्रकल्पाच्या टेल म्हंणजे शेवटच्या टोकावर आहे.
वरठीसह एकलारी, नेरी, पाचगाव, बोथली, पांजरा, मोहगाव, बीड, सोनुली, सिरसी, जमनी- दाभा आदी परिसरातील शेतकरी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. रविवारी लोकमत प्रतिनिधीने या भागाचा आढावा घेतला असता या भागातील ७० टक्के पीक गेल्यागत जमा आहे. काही भागातील शेतात धान उभे असले तरी त्याला पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होणार असल्याचे दिसते. अनेक शेतात पाणी न मिळाल्याने भेगा पडल्या आहेत.
१ आॅक्टोबरला वरठी येथे आंदोलन झाले. यात शेतकऱ्यांना तत्काळ पाणी देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. पण ८ दिवस लोटूनही थेंबभर पाणी मिळाले नाही. पाणी मिळण्याच्या आशेवर शेतकरी होता, पण पाणी मिळाले नाही. शेतकरी विवंचनेत सापडला आहे. दरम्यान पाचगाव व एकलारी येथील शेतकºयांशी चर्चा केली असता त्यांनी आपली व्यथा मांडली. प्रत्येक जण शेतातील पीक दाखवण्यासाठी धडपडत होता. टिकाराम मारवाडे, प्रेमलाल बालपांडे, ताराचंद शहरे, नरेश वंजारी, ग्याशीलाल पटले व संजू गणवीर यांच्या शेतातील पीक पूर्णत: गेल्याचे सांगितले. नेरी येथील राजू हजारे, सेवक मलेवार, प्रल्हाद कारेमोरे, रमेश उमरकर, डोकेपर पांडुरंग किरपाने, वासुदेव हिवसे, लक्ष्मण मारवडे व चंद्रभान रामटेके आणि मोहगाव येथील शेतकऱ्यांनी सारखीच गऱ्हाणी मांडली.
जिल्हा प्रशासनाची पोकळ घोषणा
शेतकऱ्याचे आंदोलन लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेला जवळपास आठवडा लोटला, पण अद्याप शेतीला पाणी मिळाले नाही. शेतकरी हवालदिल असताना जिल्हा प्रशासनाने पोकळ आश्वासन देऊन दिशाभूल झाल्याने शेतकरी संतापलेले आहेत. प्रकल्प अधिकाºयाचे असहयोग असताना जबाबदार अधिकारी खोटी घोषणा देत असतील तर शेतकऱ्यांनी न्याय कुणाला न्याय मागायचे. प्रकल्प अधिकारी यांनी तात्काळ पाणी सोडण्याचे तहसीलदार मोहाडी यांना लेखी आश्वासन दिले. आठ दिवस होऊनही शेतकऱ्यांना थेंबभरही पाणी मिळाले नाही. वरठी भागात असलेल्या मोहगाव, डोकेपार, बोथली पांजरा, एकलारी व पाचगाव भागात असलेल्या नहर कोरडेच आहेत. जिल्हाधिकारी यांची भेट घालवून देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देत तहसीलदार स्वत: बाहेर गेले.
च्प्रकल्पाचे पाणी शेतात नहराच्या माध्यमातून येते. नहराच्या देखभाल दुरुस्तीत गैरप्रकार झाल्याचे दिसते. दुरुस्तीवर खर्च दाखवण्यात येते. मात्र प्रत्यक्षात कुठलेही काम झाले नाही. नहाराची देखभाल दुरुस्ती न झाल्याने गवत उगवले आहे.पाण्याचा निचरा योग्य होणार नाही. यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च दाखवण्यात येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात असलेले पाणी २०० रुपये तासाप्रमाणे विकत घेऊन पीक वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे. शेतपिक गेल्याने आर्थिक व मानसिक नुकसान शेतकऱ्यांच्या वाट्याला आले त्याबरोबर आंदोलनात गुन्हे दाखल झाल्याने हेलपाटे घालावे लागणार ती समस्या वेगळी. त्यांच्यामागे कारवाईसाठी ससेमिरा सुरु होणार हे मात्र निश्चित आहे.