धान गिरणी संचालक पायउतार
By Admin | Updated: September 25, 2015 00:23 IST2015-09-25T00:23:15+5:302015-09-25T00:23:15+5:30
पंचशील सहकारी धान गिरणी मर्या. मासळचे संचालक लाल प्रसाद गोंडाणे यांनी धान गिरणीच्या रकमेची अफरातफर केल्याने त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे.

धान गिरणी संचालक पायउतार
मासळ : पंचशील सहकारी धान गिरणी मर्या. मासळचे संचालक लाल प्रसाद गोंडाणे यांनी धान गिरणीच्या रकमेची अफरातफर केल्याने त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे.
लालप्रसाद शामदेव गोंडाणे हे दि पंचशील सहकारी धान गिरणी मर्या. मासळ र.नं. १०५ चे संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचा पदाचा दुरूपयोग करून धानगिरणीच्या हजो रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार संस्थेचे सदस्य अर्जून तुकडू नान्हे यांनी सहायक निबंधक लाखांदूर यांच्याकडे ३ सप्टेंबर २०१४ ला केली होती.
दि.१४ आॅगस्ट २०१४ च्या तपशिलानुसार संस्थेचे संचालक लालप्रसाद गोंडाणे यांचेकडे २०११-१२ या आर्थिक वर्षात ७४० रूपये अडव्हॅन्स थकित होते. त्यानंतर सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात त्यांनी एकूण ५६७५ रूपये अडव्हान्स घेतले. पुन्हा सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात एकूण २४ हजार ३२५ रूपये अॅडव्हान्स घेतले होते.
अशाप्रकारे ३० हजार ७१२ रूपये एकंदरीत अॅडव्हान्स रक्कम गोंडाणे यांच्याकडे होती. यापैकी २० आॅगस्ट २०१२ ला २२५ रूपये आणि १२ एप्रिल २०१३ ला १० हजार ०६० रूपये परत केले. त्यामुळे १४ आॅगस्ट २०१४ रोजी त्यांच्यावर २० हजार ४२७ रक्कम थकित असल्याचे आढळले. कायद्यानुसार संचालकाला एका महिन्याच्या कालावधीत अॅडव्हान्स घेतलेल्या रकमेचा हिशेब संस्थेला देणे अनिवार्य असताना सदर संचालकाने मात्र वरील रकमेचा उपयोग स्वत:च्या हितासाठी सुमारे अडीच वर्षे केला. या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याने २८ आॅगस्ट २०१४ ला संचालक गोंडाणे यांनी थकीत रकमेचा भरणा केला असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. परंतु तक्रारकर्त्यांनी सहायक निबंधकांकडे तक्रार केली होती. तक्रारीची चौकशी करून लालप्रसाद गोंडाणे यांना संचालक मंडळातून काढण्याचा सहायक निबंधकांनी निर्णय दिला. (वार्ताहर)