ढगाळ वातावरणाने उडाली धान उत्पादकांची झोप
By Admin | Updated: October 25, 2014 22:34 IST2014-10-25T22:34:40+5:302014-10-25T22:34:40+5:30
आनंदाचा पर्व दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात असतानाच, अचानक आलेल्या ढगाळ वातावरणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. आज पहाटेपासुनच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी

ढगाळ वातावरणाने उडाली धान उत्पादकांची झोप
भंडारा : आनंदाचा पर्व दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात असतानाच, अचानक आलेल्या ढगाळ वातावरणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. आज पहाटेपासुनच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धान कापणी झालेल्या तसेच कापणी अवस्थेत असलेल्या धान पिकासह तूर पिकावर संकट ओढावले आहे.
भंडारा जिल्हा धान कोठार म्हणून प्रसिध्द आहे. परंतु मागील पाच वर्षांपासून जिल्ह्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांची पेरणी धोक्यात आली होती. शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांनी रोवणी आटोपली. परंतु निसर्गाचा प्रकोप आणि किडींचा प्रादुर्भाव त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. महागडी औषधी खरेदी करून शेतकऱ्यांनी पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु आजही किडींचे आक्रमण सुरूच आहे. भितीपोटी शेतकऱ्यांनी धान कापणीला प्रारंभ केला. शेतामध्ये कडपा पडलेल्या आहेत. यातच आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली. परिणामी शेतकरी धास्तावला आहे.
जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून झालेल्या वातावरण बदलामुळे विविध आजारांचे रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण भागासह शहरातील अनेक रूग्ण खासगी तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी करताना दिसून येत आहेत. सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणे आदी लक्षणे असणारी रूग्ण अधिक प्रमाणात आहेत. (शहर प्रतिनिधी)