धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:09 IST2018-10-27T22:09:02+5:302018-10-27T22:09:21+5:30
संजय साठवणे। लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : शेतकºयांचा धान घरी येताच व्यापाऱ्यांकडून लूट सुरु झाली आहे. रोखीने पैशाचे आमीष ...

धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शेतकºयांचा धान घरी येताच व्यापाऱ्यांकडून लूट सुरु झाली आहे. रोखीने पैशाचे आमीष दाखवत हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत आहे. सणासुदीच्या दिवसात आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी व्यापाºयांच्या भूलथापांना बळी पडत आहे. साकोली तालुक्यात हा प्रकार खुलेआम सुरु असून व्यापारी १५०० रुपये क्विंटलने धानाची खरेदी करीत आहेत.
यावर्षी अपुऱ्या पावसाने दुष्काळाचे सावट असताना थोडाथोडका धान शेतकऱ्यांच्या घरी आला आहे. दिवाळी सणापुर्वी धान विकून दिवाळी साजरी करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र शासकीय धान खरेदी केंद्रावर वेळेवर पैसे मिळत नसल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत.
शासनाने साकोली तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. त्याठिकाणी उच्च प्रतीच्या धानाला १७७० आणि निम्न प्रतीच्या धानाला १७०० दर निश्चित केला आहे. मात्र यावर्षी या केंद्रावर धान देण्यासाठी सातबारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक घेऊन आॅनलाईन अर्ज करावा लागत आहे. यानंतर जो क्रमांक मिळतो त्यानुसार धानाची विक्री करावी लागते. यात बराच कालावधी जातो. तसेच नगदी पैसेही मिळत नाही. उलट हमाल धान मोजणी करताना ७० किलोच्या पोत्यावर दोन किलो ओल्या धानाच्या नावाखाली अधिक घेतात. तसेच पोते मोजतानाही गडबड केली जाते. त्यामुळे शेतकºयांचे तीन ते चार किलो धान अधिक जातात. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते.
आता या संधीचा फायदा व्यापारी घेत आहेत. व्यापाऱ्यांचे दलाल गावोगाव फिरत असून नगदी पैशाचे आमीष देऊन शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करीत आहेत. १५०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी केली जात आहे.
अडलेला शेतकरी या व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकत आहे. समोर दिवाळी असल्याने नाईलाजाने तो व्यापाऱ्यांना आपला धान देत आहे. मात्र यातून मोठ्या प्रमाणात शेतकºयांची लूट होत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि हमीभावापेक्षा कमी किमतीत धान खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आहे.
आधारभूत केंद्रावर जादा धान?
शासन निर्णयाप्रमाणे आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा धान मोजताना ४० किलो धान व पोत्याचा ६०० ग्रॅम असे एकुण ४० किलो ६०० ग्रॅम धान मोजावे असा नियम आहे. मात्र बहुतांश आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी करून ४० किलो धानाची पावती दिली जाते. शेतकऱ्याकडून १४०० ग्रॅम धान सुकवून अधिकचे घेतले जातात. येथेही शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. याकडे कोणाचे लक्ष दिसत नाही.