पारडी गावातील धानाचे पुंजणे पेटविले
By Admin | Updated: November 5, 2015 00:36 IST2015-11-05T00:36:57+5:302015-11-05T00:36:57+5:30
पारडी येथील प्रल्हाद पंढरी कापगते व यशवंत टांगसू डोंगरवार यांचे शेतातील धानाचे पुंजणे आज पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने पेटविल्याची घटना घडली.

पारडी गावातील धानाचे पुंजणे पेटविले
पारडी येथील घटना : अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
दिघोरी (मोठी) : पारडी येथील प्रल्हाद पंढरी कापगते व यशवंत टांगसू डोंगरवार यांचे शेतातील धानाचे पुंजणे आज पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने पेटविल्याची घटना घडली.
प्रल्हाद कापगते यांनी साडेतीन एकर शेतात जे.जे. एल. व कोयला या मध्यम निघणाऱ्या जातीची लागवड केली होती. त्यामुळे त्यांचे धान लवकरच कापणी व बांधणीला आले. अवघ्या काही दिवसांपूर्वीच कापगते यांनी धानाचे दोन पुंजणे बांधीत ठेवले होते. परंतु कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे दोन्ही पुंजणे पेटविले. तसेच यशवंत यांचे दीड एकर शेतीचे पुंजणे अज्ञात इसमाने पेटविले. अगोदरच शेतकरी आपले जीवाचे रान करून धानपिकाला विविध रोग व किडीपासून तसेच निसर्गाशी सामना करून जगवितो व आपल्या पोटापाण्याची सोय निर्माण करतो. त्यातच अनेकदा त्याला कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करावा लागतो. तरीही शेतकरी राजा हिंमत न हरता दरवर्षी नव्या जोमाने शेती करीत असतो. मात्र, समाजातील काही वाईट प्रवृत्तीचे माणसे हातात आलेले पीक जर पेटवित असतील तर शेतकऱ्याने जगावे कसे असा प्रश्न निर्माण होतो.
प्रल्हाद कापगते यांचे तीन एकर शेतातील एकूण एक लक्ष रुपयाचे नुकसान झाले तर यशवंत टांगसू डोंगरवार यांचे दीड एकर शेतीतील एकूण ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामा केला (वार्ताहर)