मोहाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:34+5:302021-04-23T04:37:34+5:30
मोहाडी : येथील ग्रामीण रुग्णालय सुसज्ज असून, ३० ते ४० खाटांची व्यवस्था आहे. त्यामुळे येथे गंभीर आजारी रुग्णांसाठी ऑक्सिजनची ...

मोहाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था
मोहाडी : येथील ग्रामीण रुग्णालय सुसज्ज असून, ३० ते ४० खाटांची व्यवस्था आहे. त्यामुळे येथे गंभीर आजारी रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी मोहाडी तालुका पत्रकार संघातर्फे करण्यात आली आहे.
सध्या कोरोनाने थैमान घातले असून, अनेक रुग्णांना कोविड रुग्णालयात बेड मिळत नसल्याने त्यांचा ऑक्सिजन न मिळाल्याने रस्त्यावरच जीव जात आहे. अनेक तालुक्यांत सुसज्ज ग्रामीण रुग्णालये आहेत, मात्र ते शोभेची वस्तू बनून आहेत. जर याच रुग्णालयात सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. सध्या शरीरात ऑक्सिजनची कमी होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. दररोज शेकडो रुग्ण भरती होण्यासाठी रुग्णालयात जातात, परंतु बेडची कमतरता असल्याने त्यांना बेड मिळत नाही व ते ॲम्ब्युलन्स किंवा चारचाकी वाहनातच आपला जीव सोडतात. अशा वाईट स्थितीत ग्रामीण रुग्णालयात अनेक बेड रिकामे असतानासुध्दा सोयी-सुविधा नसल्याने तेथील बेड निरुपयोगी आहेत. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करावी, आवश्यक आरोग्य कर्मचारी नियुक्त करावे, त्यासाठी आरोग्य विद्यालयातील शिकाऊ उमेदवारांची भरती करावी व होणाऱ्या मृत्यू संख्येवर नियंत्रण आणावे. मानवी जीवन अमूल्य आहे. ग्रामीण रुग्णालयाला जीवनदान रुग्णालय बनवावे, अशी मागणी मोहाडी तालुका पत्रकार संघातर्फे सिराज शेख, नरेंद्र निमकर, राजू बांते, सुनील मेश्राम, खुशाल कोसरे, यशवंत थोटे, गिरधर मोटघरे, सदाशिव ढेंगे, अफरोज पठाण, नईम कुरेशी, जिब्राईल शेख आदींनी केली आहे.