झाडे उन्मळून पडली, आंब्याचे मोठे नुकसान, भाजीपाला, उन्हाळी धानपीक जमीनदोस्त अकाली पावसाने झोडपले, पवनी अंधारात
भंडारा : जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून भंडारा शहरात विजेचा लपंडाव रात्रभर सुरू होता. पवनी शहरात मंगळवारीही वीज पुरवठा ठप्प राहिला. करडीत भाजीपाला पिकांचे नुकसान मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वार्यासह मुुसळधार पावसाचा तडाखा बसला. अनेक झाडे कोलमडली. कौलारु घरांचे नुकसान झाले. फळबागा, भाजीपाला व उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने अक्षरश: करडी परिसराला झोडपून काढले. झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. टिनपत्रे, कौलारू छत उडाले. भाजीपाला पिके, उन्हाळी धानपीक जमिनदोस्त झाले. टमाटर पिकाचे अतोनात नुकसान झाले.
रस्त्यावरील व शेतातील झाडे उन्मळून कोसळली आहेत. रात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाला. विजेच्या कडकडाटाने लहान मुले झोपेतून उठून बसली. कोका अभयारण्यातील अनेक झाडे कोसळली. आंबा पिकाचेही नुकसान झाले. वीट व्यावसायिकांचे नुकसान मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले. दिवसभर स्वच्छ ऊन्ह होती. पावसाची कुठलिही चिन्हे नव्हती. असे असताना पाऊस झाल्याने नुकसान टाळण्याची वीट व्यावसायिकांना संधी मिळाली नाही. लाखो विटा पावसात भिजल्या. कच्च्या विटांच्या भट्टीत पाणी शिरल्याने विटांचे नुकसान झाले. पालांदुरात दमदार पाऊस भर उन्हाळ्यात वातावरणात गारवा तयार झाला. यंदाचा उन्हाळा पावसाळासदृश आहे. पहाटेच्या सुमारास एक तास पाऊस बरसला. विजांच्या लखलखाटामुळे शेतीचे कामे प्रभावित झाली. निसर्गावर शेती अवलंबून असल्याने अनिश्चित हवामानाचा मोठा परिणाम होत आहे. रब्बीचा हंगाम कापणीला आला आहे. धानाच्या कडपा भिजल्यामुळे मूल्य कमी झाले आहे. ढगाळ हवामानामुळे बागायती शेतीचेही नुकसान झाले आहे. एक महिन्याच्या कालावधीत तीनदा पावसाने हजेरी लावली. रोजच वातावरण ढगाळ असल्यासारखा राहतो. यंदाचा पावसाळा कमी राहण्याची चिन्हे असून पाऊस धोका देणारा आहे. सुरूवातीला अत्यल्प तर शेवटी नुकसान करणारा पाऊस राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. बळीराजा खरिपाच्या पूर्वतयारीत गुंतला असताना अकाली पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कृषी केंद्राने खते व धानपिकाचे विक्रीला आणले आहेत.
खरीब हंगाम अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी बदलत्या हवामानामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पवनीत अंधार रात्रीपासून मेघगर्जनेसह पाऊस बरसला असून वीज पुरवठा पुर्णत: ठप्प झाला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत पवनी शहर अंधारात होते. या पावसामुळे कौलारु घरांचे नुकसान झाले. फळबागा, भाजीपाला व उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. उन्हाळी धानपिक जमीनदोस्त झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क) जिल्ह्यात ६५.८ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सकाळी ८ वाजतापर्यंत एकूण ६५.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून तिची सरासरी ९.४ मि.मी. आहे. भंडारा तालुक्यात १७.५ मि.मी., मोहाडी १०.२, तुमसर १४.१, पवनी १.०, साकोली ४.०, लाखनी १७.८ व लाखांदूर १.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यातील बेला, शहापूर, धारगाव, पहेला, मोहाडी तालुक्यातील करडी, तुमसर तालुक्यातील मिटेवानी, सिहोरा, गर्रा, पवनी तालुक्यातील चिचाळ, कोंढा, आसगाव, अड्याळ, साकोली तालुक्यातील एकाडी, लाखनी तालुक्यातील पिंपळगाव, पोहरा, पालांदूर व लाखांदूर तालुक्यातील बारव्हा व मासळ आदी ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला.