निकालाची उत्सुकता; जत्थे दूरदर्शन संचासमोर
By Admin | Updated: May 16, 2014 23:50 IST2014-05-16T23:50:02+5:302014-05-16T23:50:02+5:30
दूरदर्शन संचासमोर बसून नागरीक लोकसभा निवडणुकीतील निकाल जाणून घेत होते. निवडणूक कोण बाजी मारणार? ही उत्सुकता नवमतदारांपासून आबालवृद्धापर्यंंत सर्वांंमध्ये होती.

निकालाची उत्सुकता; जत्थे दूरदर्शन संचासमोर
चंदन मोटघरे- भंडारा दूरदर्शन संचासमोर बसून नागरीक लोकसभा निवडणुकीतील निकाल जाणून घेत होते. निवडणूक कोण बाजी मारणार? ही उत्सुकता नवमतदारांपासून आबालवृद्धापर्यंंत सर्वांंमध्ये होती. देशातील निवडणुकीचे एकंदरीत चित्र टिव्हीतूनच जनतेला कळले. भंडार्यात मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताच कोण कितीने समोर आहेत, हे विचारणार्यांची संख्याही बरीच होती. सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला, तेव्हापासून प्रत्येकांच्या घरचे दूरदर्शन संच सुरू झालेले होते. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात पार पडली. मतमोजणी ज्या ठिकाणी झाली. त्या परिसरात जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आल्यामुळे प्रवेशपत्रधारकांशिवाय लोकांची गर्दी नव्हती. प्रवेश मिळत नसल्याचे पाहून लोकांनी टी.व्ही. च्या माध्यमातून निकाल जाणून घेतला. प्रत्येक चौकातील पानटपरीसमोर, दुकानासमोर दूरदर्शन संच लावलेले होते. भंडारा मतदारसंघाच्या निकालासोबतच हिंदी व मराठी वाहिन्यांमधून निकालाची माहिती जाणून घेताना दिसले. घरातील दूरदर्शन संचासमोर बसून कुटूंबासोबत निकालांची माहिती घेणारेही कुटूंबही अनेक होते. प्रत्येकांच्या तोंडी परिवर्तन हेच नाव होते. एनडीए सरकारने मारलेली बाजी हाच विषय प्रत्येकाच्या मुखात होता. भंडारा-गोंदिया क्षेत्रात भाजपाचे नाना पटोले व राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांच्यात थेट लढत होणार, अशी चिन्हे होती. प्रत्येक फेरीनंतर भाजपाचे नाना पटोले पुढे असल्याच्या वार्ता बाहेर येत होत्या. एनडीए, युपीएने किती जागा मिळविल्या ही आकडेवारी टी.व्ही. वर झळकत होती. या निवडणुकीत ‘मोदी’ लहरीचा प्रभाव दिसून आला. त्याचाच परिणाम भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकात दिसून आला. मतमोजणी केंद्रावरून सकाळी ८.३0 वाजता शुकशुकाट होता. पोलीस विभागाने कारधा नाक्यापासून रस्ता प्रतिबंधित केला होता. अवजड वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरून बंदी केली होती. पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.