लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत आठ दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊन तब्बल १४९ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील ८१ रुग्णांचा समावेश आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७०१ असून सुदैवाने बुधवारी कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या सर्वांच्या चिंतेचा विषय झाली आहे.भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नवीन वर्षात अगदी नगण्य होती. दोन आकडी रुग्णसंख्या तीही ५० च्या आत राहत होती. परंतु गत १० दिवसापासून रुग्णसंख्या वाढायला लागली. तपासणीच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक येत असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी १५७१ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात १४९ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. भंडारा तालुक्यात ८१, मोहाडी १२, तुमसर २२, पवनी २६, लाखनी १, साकोली ७ रुग्ण आढळून आले. लाखांदूर तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नाही. बुधवारी ३८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सध्या ७०१ रुग्ण उपचाराखाली आहेत. कुणाच्याही मृत्यूची नोंद नसली तरी मृतांचा आकडा ३२९ झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५२ हजार ७२८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने घेण्यात आले. त्यात १४ हजार ६२१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. भंडारा तालुक्यात ६२४७, मोहाडी ११२३, तुमसर १८८६, पवनी १३८८, लाखनी १५६३, साकोली १७५७, लाखांदूर ६६७ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी १३ हजार ६०१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ७०१ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा तालुक्यात ३८६, मोहाडी ३९, तुमसर १०१, पवनी ८५, लाखनी ४३, साकोली ३७ आणि लाखांदूर तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ३७ हजार व्यक्तींना कोरोना लस जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून, आतापर्यंत ३७ हजार ५४ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. त्यात हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, ४५ ते ६० आणि ६० वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. भंडारा, तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर, मोहाडी, लाखनी येथील जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. जानेवारी महिन्यात ३,४५४ हेल्थकेअर वर्करला लस देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात १० हजार ६७३ व्यक्तींना लस देण्यात आली तर, या महिन्यात १६ मार्चपर्यंत २२ हजार ९४७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.९६ टक्के जिल्ह्यात अलिकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.९६ टक्के आहे. आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असून अलिकडे चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मृत्यूदर २.२४ टक्के असून गत काही दिवसात कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही.