शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणाला दांडी
By Admin | Updated: July 6, 2015 00:26 IST2015-07-06T00:26:07+5:302015-07-06T00:26:07+5:30
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यात ४ जुलैला सर्वेक्षणाचे आयोजन केले होते.

शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणाला दांडी
निवडणुकीचा फटका : ११ जुलैला होणार सर्वेक्षण
प्रशांत देसाई भंडारा
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यात ४ जुलैला सर्वेक्षणाचे आयोजन केले होते. मात्र, भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने हा जिल्हा याला अपवाद ठरला आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीचा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कायद्यानुसार, राज्यातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी शिक्षण विभागाने पाऊले उचललेली आहे. त्यानुसार, शिक्षणात आमूलाग्र बदल केले आहेत. मागील वर्षी शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जिल्ह्यात ७३ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. सर्वेक्षणानंतरही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले होते.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार, राज्यातील कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये व शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने ४ जुलैला राज्यात एकाच दिवशी सर्व्हेक्षण करायचे होते.
भंडारा जिल्ह्यातील ८७५ गावांमधील ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करायचे होते. मात्र, ४ जुलैला भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होती. यासाठी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाले नाही. शिक्षण, महिला व बालकल्याण, महसूल, पोलीस, पालिका, कामगार आयुक्त कार्यालय, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करावयाचे आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम झाली नाही. याबाबत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पूर्वीच शिक्षण आयुक्त पुणे यांना माहिती देऊन तशी परवानगी घेतली. ही मोहिम ११ जुलैला राबविण्यात येणार आहे. यासंबंधाने ७ जुलैला सर्व विभागप्रमुखांची सभा बोलविली आहे. सर्वेक्षणासाठी तीन हजार कर्मचारी लागणार आहे.
- एकनाथ मडावी,
शिक्षणाधिकारी (प्राथ.) भंडारा.