अन्यथा पहिल्या दिवशी शाळा उघडणार नाही
By Admin | Updated: June 13, 2017 00:18 IST2017-06-13T00:18:04+5:302017-06-13T00:18:04+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही आश्वासनानंतरही तोडगा काढलेला नाही.

अन्यथा पहिल्या दिवशी शाळा उघडणार नाही
कृती समितीचा निर्णय : १७ ला होणार शिक्कामोर्तब, शिक्षकांच्या मागण्यांवर जि.प. प्रशासनाचे आश्वासनाचे गाजर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही आश्वासनानंतरही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे जि.प. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास २७ जून पासून सुरु होणाऱ्या शाळा उघडणार नसल्याचा निर्णय आज झालेल्या शिक्षक कृती समितीत घेण्यात आला.
मागील आठ महिन्यांपासून जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व केंद्र प्रमुखांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक जि.प. प्रशासनाशी संघर्ष करीत आहेत. मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येवून शिक्षक कृती समितीचे गठण केले. यानंतर अनेकदा आंदोलने करण्यात आली. यावर जिल्हा परिषद प्रशासनाने आंदोलन थांबविण्यासाठी आंदोलनकर्त्या शिक्षक नेत्यांना आश्वासने दिलीत. मात्र तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही मागण्यांची पूर्तता झालेली नाही.
जि.प. प्रशासनाने आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने शिक्षक कृती समितीने याबाबत अंतिम निर्णय घेण्याच्या दृष्टीने आज सोमवारला जि.प. शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास २७ जून ला शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशीपासून शाळा सुरु न करता त्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला अंतिम स्वरुप देण्याकरिता १७ जूनला तालुकास्तरीय सर्व संघटना व जिल्हास्तरीय कृती समिती यांची संयुक्त सभा बोलाविण्यात आली आहे. ही सभा दुपारी १२ वाजता ग्राहक भंडार येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मागण्यासंदर्भात चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्याचा आजच्या सभेत निर्णय घेण्यात आला. या सभेला मुबारक सैय्यद, ओमप्रकाश गायधने, विकास गायधने, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, वसंत साकुरे, जयंत उपाध्ये, मुकुंद ठवकर, प्रमोद ठमे, सुनिल वाघमारे, संदीप वहिले, हरिकिसन अंबादे, मुकेश मेश्राम, सुधाकर ब्राम्हणकर, रमेश पारधीकर आदी उपस्थित होते.