अन्यथा अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर
By Admin | Updated: March 22, 2017 00:27 IST2017-03-22T00:27:01+5:302017-03-22T00:27:01+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनाचा व इतर समस्या मार्गी न लागल्यास १ एप्रिल पासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जातील, ....

अन्यथा अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर
भंडारा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनाचा व इतर समस्या मार्गी न लागल्यास १ एप्रिल पासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा खणखणीत इशारा अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी फेडरेशनच्या राष्ट्रीय महासचिव विजयालक्ष्मी यांनी दिला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात सोमवारपासून सुरु झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आक्रोश आंदोलनाप्रसंगी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) ने दोन दिवसीय मुक्कामी आक्रोश आंदोलनाचा विविध मागण्यांच्या संदर्भात इशारा दिला होता.
परिणामी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांचे कर्मचाऱ्यांविना हाल होत आहेत.
परंतु शासन व प्रशासनाचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे मंडपात उपस्थित आयटकचे कार्याध्यक्ष हिवराज उके, दिलीप उटाणे, सविता लुटे यांनी म्हटले आहे. मंगळवारी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री महिला व बालकल्याणमंत्री यांच्या नावे निवेदन सादर केले आहे. ४८ तासांचे आक्रोश आंदोलन आटोपले असले तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. सोमवारपासून सुरु झालेल्या आंदोलनात रात्रीला या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंडपाशेजारीच स्वयंपाक केला. आंदोलनाच्या शेवटी जिल्हा परिषदेचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी. ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)