कारगिल विजय दिवसानिमित्त देशभक्तीपर गीतांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:34 IST2021-07-29T04:34:33+5:302021-07-29T04:34:33+5:30
देशातील सैन्याने याच दिवशी म्हणजे २६ जुलै १९९९ रोजी कठीण अशा कारगिल युद्धात डोंगराच्या वर असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करून ...

कारगिल विजय दिवसानिमित्त देशभक्तीपर गीतांचे आयोजन
देशातील सैन्याने याच दिवशी म्हणजे २६ जुलै १९९९ रोजी कठीण अशा कारगिल युद्धात डोंगराच्या वर असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करून विजय मिळविला होता. परंतु या युद्धात आपले काही वीर सपुत शहीदही झाले होते. त्या विजयाची आठवण व शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीप प्रज्वलन व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी देशाचे रक्षण करून सैन्यातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित माजी सैनिकांनी सैन्यदलात काम करत असतांना त्यांना आलेले अनुभव, त्याच बरोबर विद्यार्थी, विद्यार्थिनींना सैन्यदलात रूजू होण्याच्या वेगवेगळ्या संधी याबाबत अमूल्य मार्गदर्शन केले. देशभक्तीपर गीत, भाषण, कविता इत्यादी गोष्टींत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन देशप्रेमाचे धडे दिले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद गट, डोंगरगाव व गुरुदेव बिसने कनिष्ठ महाविद्यालय, मोहाडी येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता प्रेरणादायी देशभक्तीपर गीताने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अविनाश चौधरी होते. अतिथी म्हणून माजी सैनिक माधव मोटघरे, माजी सैनिक विजय पेशने, गणपत शेबे, पत्रकार सिराज शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे तालुका व्यवस्थापक विशाल कुंभकर्ण, प्रशिक्षक छाया गुरव, शाळा सहाय्यक अधिकारी नितीन कोल्हे, शिवराज कावडकर, अंकुश मंगळे, प्रशांत पाटील, दीपक गावंडे, समुदाय समन्वयक त्रिवेणी समरीत, तारा हेडावू, अश्विनी अंबिलडुके, शुभांगी मोटघरे, भरत गभने आदींनी सहकार्य केले.