रोजगार सेवकाला कामावरून काढण्याचे आदेश
By Admin | Updated: March 12, 2016 00:44 IST2016-03-12T00:44:54+5:302016-03-12T00:44:54+5:30
तालुक्यातील परसोडी येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत होणाऱ्या कामामध्ये रोजगार सेवक क्रिष्णा रहांगडाले यांनी तलावातील गाळ काढण्याचे कामात ...

रोजगार सेवकाला कामावरून काढण्याचे आदेश
लाखनी : तालुक्यातील परसोडी येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत होणाऱ्या कामामध्ये रोजगार सेवक क्रिष्णा रहांगडाले यांनी तलावातील गाळ काढण्याचे कामात शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याबाबत दोषी आढळून आल्याने कामावरून कमी करण्याचे आदेश गट विकास अधिकारी यांनी दिले आहेत.
परसोडी येथील मनोज पटले व इतर चौदा व्यक्तींनी ग्रामपंचायत परसोडी येथील रोजगार सेवक कृष्णा रहांगडाले यांनी गावातलाव खोलीकरणाच्या कामात निघणाऱ्या मातीचे प्रती ट्रॉली १०० रूपये प्रमाणे पैसे घेतल्याची तक्रार ७ जून २०१५ ला पंचायत समिती लाखनी येथे करण्यात आली होती. सदर तक्रारीची चौकशी विस्तार अधिकारी जी.पी. चकोले यांनी केली. त्यात रोजगार सेवकाने पैसे घेतल्याचे सिद्ध करता येत नाही, असे स्पष्ट केले होते.
तक्रारकर्त्यांनी १७ डिसेंबर २०१५ ला पंचायत सतिमीकडे फेरतक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने रोजगार सेवक क्रिष्णा रहांगडाले, ट्रॅक्टर मालक विठ्ठल पटले, लिलाधर रहांगडाले, सचिन शहारे यांना १७ फेब्रुवारी २०१६ ला कारणे दाखवा नोटीस दिले. यात लिलाधर रहांगडाले यांनी नोटीसाला उत्तर दिले. मनोज पटले, धनपाल पटले, चंद्रशेखर पटले, निलकंठ राऊत, केवळ पटले, पुरूषोत्तम चारमोडे, विलास बडोले, भागवत पटले यांनी रोजगार सेवकाने प्रति ट्रॉली १०० रूपये प्रमाणे पैसे घेतल्याचे बयानात लिहून दिले. मग्रारोहयोमध्ये शेतकऱ्याचे शेतात माती पोहचविण्यासाठी पैसे घेण्याची तरतूद नसल्याचे रोजगार सेवकाने शेतकऱ्याला सांगायला पाहिजे. परंतु रोजगार सेवकाने शेतकऱ्यांनी पैसे दिल्याशिवाय तलावातील माती मिळणार नाही असे सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली ते शेतकरी तलावातील गाळ काढण्याचे कामावर होते.
त्यांनी तक्रार केली म्हणून रोजगार सेवकाने त्यांचे नाव हजेरी पत्रकात लिहले नसल्याचे तक्रारकर्त्यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटीच्या वेळी सांगितले. या प्रकरणात रोजगार सेवकाला दोषी माणून रोजगार सेवक पदावरून काढण्याचे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (तालुका प्रतिनिधी)