रेतीघाट कंत्राटदाराला स्पष्टीकरणाचे आदेश

By Admin | Updated: June 25, 2017 00:23 IST2017-06-25T00:23:23+5:302017-06-25T00:23:23+5:30

तालुक्यातील चारगाव रेतीघाटावर रेती माफियांचे राज्य सुरू होते. येथे सर्रास यंत्राने रेतीचे खनन सुरू होते.

Order of clarification to the sandgate contractor | रेतीघाट कंत्राटदाराला स्पष्टीकरणाचे आदेश

रेतीघाट कंत्राटदाराला स्पष्टीकरणाचे आदेश

चारगाव रेतीघाटावर मशीनने खनन : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश
मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील चारगाव रेतीघाटावर रेती माफियांचे राज्य सुरू होते. येथे सर्रास यंत्राने रेतीचे खनन सुरू होते. २२ जून रोजी चारगाव रेती घाटावर मशीनने रेतीचे खनन या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच महसूल प्रशासनात खळबळ उडाली. तुमसरचे तहसिलदार बालपांडे यांनी संबंधित कंत्राटदाराला स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश बजावले आहे. तुमसर तालुक्यातील तलाठी तथा मंडळ अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेशही दिले.
चारगाव रेतीघाटातून मशीनच्या सहायाने अवैध रेती उपसा मागील काही दिवसापासून अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरून हाकेच्या अंतरावर चारगाव रेतीघाट आहे. येथून अधिकारी दररोज ये-जा करतात. नदीपात्रापासून मशीनने रेतीचे उत्खनन करताना बघितले, परंतु महसूल प्रशासनाला ते दिसत नाही.
२२ जून रोजी ‘लोकमत’मध्ये चारगाव रेतीघाटावर मशीनने रेतीचे खनन असे वृत्त प्रकाशित होताच महसूल प्रशासन खडबळून जागे झाले. चारगाव येथील कंत्राटदार के.बी. इंटरप्राईजेस यांना स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले. नदी पात्रातील गट क्रमांक ७० अंशता, ११.१६.१७ आराजी ४.५० हेक्टर येथील रेतीघाट २०१६-१७ करिता ३० सप्टेंबरपर्यंत मंजूर आहे.
पत्र मिळताच स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश तहसिलदार गजेंद्र बालपांडे यांनी दिले. यासंदर्भात तहसिलदार बालपांडे यांनी जिल्हाधिकारी व तुमसरचे उपविभागीय अधिकारी यांना माहिती सादर केली आहे. गौण खनिज उत्खनन होऊ नये मंजूर रेतीघाटातून मशीनने उत्खनन होऊ नये व झाल्यास त्यांच्यावर विहित कारवाई करता यावी, नैसर्गीक आपत्ती कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाकरिता, पीक कर्ज घेण्याकरिता खातेदारांना सात बारा तसेच अन्य कागदपत्रे विहीत मुदतीत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तलाठी, मंडळ अधिकारी यांनी आपल्या साहित्यातील, मंडळातील मुख्यालयी राहण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे. यात कसूर केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त व अपिल नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे.
चारगाव येथील तलाठी तथा संबंधित मंडळ अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यानेच रेती घाटातून सर्रास मशीनने रेतीचे उत्खनन सुरू होते. नऊ महिन्यापासून येथे गोरखधंदा सुरू होता. याबाबत ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश येथे देण्यात आले आहे.

चारगाव रेतीघाट कंत्राटदाराला स्पष्टीकरणाचे आदेश देण्यात आले आहे. खनन रोखण्याकरिता तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले.
-गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार, तुमसर.

Web Title: Order of clarification to the sandgate contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.