कारवाई टाळण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकाऱ्याचा बदलीसाठी खटाटोप
By Admin | Updated: September 17, 2016 01:01 IST2016-09-17T01:01:06+5:302016-09-17T01:01:06+5:30
वनकार्यालयातील सुमारे २०० वृक्षांची परवानगीविना तोड करण्यात आली. याप्रकरणावर येथील उपवनसंरक्षक यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही.

कारवाई टाळण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकाऱ्याचा बदलीसाठी खटाटोप
प्रकरण वनविभागातील वृक्षतोडीचे : दोषी असतानाही प्रकरणावर घातले जातेय पांघरूण, वरिष्ठांच्या आदेशाकडे सर्वांच्या नजरा
प्रशांत देसाई भंडारा
वनकार्यालयातील सुमारे २०० वृक्षांची परवानगीविना तोड करण्यात आली. याप्रकरणावर येथील उपवनसंरक्षक यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. दरम्यान कारवाई टाळण्यासाठी मेश्राम यांनी वरिष्ठांच्या माध्यमातून बदलीचा आटापिटा चालविल्याचे समोर येत आहे.
भंडारा उपवनसंरक्षक कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय परिसरात असलेले सागवान व अन्य प्रकारच्या वृक्षांची तोड सुमारे १० महिन्यापुर्वी करण्यात आली. या वृक्षतोडीसाठी नगरपालिकेकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे. मात्र पालिकेने वृक्षतोडीसाठी परवानगी दिलेली नसतानाही वनपरिक्षेत्रधिकारी संजय मेश्राम यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करताना वृक्षांची कत्तल केली.
यात सुमारे ८० साग झाडांची तर १२९ आडजात झाडांची तोड करण्यात आली. सदर प्रकरणाचे गांभीर्य मागील काही दिवसापासून ्न‘लोकमत’मध्ये प्रकाशित होत आहे. मात्र अशा गंभीर प्रकरणात येथील उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. याप्रकरणी प्रथमदर्शनी वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम हे दोषी आढळून येत आहे. वृक्ष कटाईचे परवानगी पालिकेने दिलेली नसतानाही त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून ही तोड केल्याचे स्पष्ट होत आहे.
सर्व सामान्य नागरिकाने एखादे सागाचे वृक्ष तोडल्यास त्याच्यावर तात्काळ वनकायद्यांतर्गत कारवाई करण्यात येते. मात्र येथे वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी शंभरावर वृक्षांची तोड केली असल्याचे दिसत असतानाही त्यांना मात्र त्या अधिकाऱ्यांकडून अभय दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला आहे. अशात भंडारा येथील वनाधिकाऱ्यांनीच वृक्षांची तोड केल्याचे प्रकरण समोर आले असतानाही त्यांच्यावर कारवाईला विलंब होत आहे. त्यामुळे वृक्षतोडीबाबत येथील वनाधिकारी गंभीर नसल्याची बाब समोर आली आहे. यात मेश्राम यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आता सर्वच स्तरातून होत आहे. दरम्यान कारवाई होईल या भितीने वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी त्यांच्या वरिष्ठांना गळ घातली असून त्यांची भंडारा येथून तातडीने बदली करावी, अशी मागणी केल्यानंतर बदलीसाठी त्यांनी खटाटोप सुरू केल्याचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान वरिष्ठांचे मार्गदर्शन व आशिर्वाद असल्याची प्रतिक्रिया मेश्राम यांनी ‘लोकमत’ला दिली.