वीज वितरण कार्यालयाचा कारभार रामभरोसे
By Admin | Updated: April 28, 2015 00:28 IST2015-04-28T00:28:30+5:302015-04-28T00:28:30+5:30
वीज वितरण कंपनी शाखा कोसरा व कोंढा या दोन कार्यालयांतर्गत ४४ गावांचा कारभार चालतो.

वीज वितरण कार्यालयाचा कारभार रामभरोसे
कोंढा कोसरा येथील प्रकार : ४४ गावांच्या ग्राहकांकडे दुर्लक्ष
कोंढा (कोसरा) : वीज वितरण कंपनी शाखा कोसरा व कोंढा या दोन कार्यालयांतर्गत ४४ गावांचा कारभार चालतो. पण येथील कारभार रामभरोसे असून दोन्ही शाखा अभियंता कार्यालयात गैरहजर राहतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसरात्र वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहे. ग्राहकांच्या तक्रारीचे समाधान कोणी करावे, असा प्रश्न पडला आहे. याकडे सहाय्यक अभियंता यांचे दुर्लक्ष करीत आहे.
सर्वात मोठी डोकेदुखी सध्या वीज वितरण विभाग कोंढा व कोसरा शाखेची आहे. कोसरा या शाखेत कनिष्ठ अभियंता लक्ष्मीनारायण मेश्राम हे कार्यरत आहेत. २२ गावातील ५ हजार वीज ग्राहकांचा संबंध या कार्यालयाशी येतो. मात्र दोन महिन् यांपासून लक्ष्मीनारायण मेश्राम हे कनिष्ठ कार्यालयात सतत गैरहजर आहेत. कोंढा येथील कार्यालयात सहाय्यक लाईनमन व दोन मदतनिस असे मंजूर कर्मचारी आहेत. परंतु एक सहाय्यक लाईनमनचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे दोन मदतनिस कोंढा कार्यालयाचा कारभार सांभाळीत आहेत. कोंढा हे मोठे गाव कोसरा कनिष्ठ अभियंता कार्यालयांतर्गत येते. या गावाची लाईन नेहमी रात्रीला केव्हाही जाते. लाईन ट्रीप होण्याचे प्रकार भर उन्हाळ्यात रात्रीला होत आहे. पंखे, कलर, मोटारपंप, दिवे सुरु राहत असल्याने वीजभार कमी पडतो. तेव्हा यासाठी २५ के.व्ही. ट्रान्सफार्मर लावणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत कोंढा यांनी मासिक सभेत ठराव ठेवून मागील वर्षी या कार्यालयास कळविले. पण त्यासंबंधी अजूनपर्यंत कारवाई झाली नाही.
कोंढा येथे वॉर्ड क्रमांक एकमध्ये लोखंडी खांब पूर्णत: खालून जंग चढले केव्हाही पडून मोठा धोका होऊ शकतो. तुकडोजी पुतळा ते पायल टॉकीज या रस्त्यावरील खांब त्वरीत बदलविण्यात यावे असा ठराव ग्रामपंचायतने दिला. पण याकडे शाखा अभियंता लक्ष देत नाही.
कोसरा कार्यालयात कनिष्ठ अभियंता भोयर कार्यरत आहेत. त्या रजेवर असल्याने येथे आठ दिवसातून एक दिवस पवनी येथून चव्हाण काम पाहण्यासाठी येतात. २२ गावचे ४ हजार ग्राहक यांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोसरा शाखेत शेतकऱ्यांचे कृषीपंप सर्वात जास्त जोडणीकरिता अर्ज आहेत. अनेक शेतकऱ्यांनी डिमांड भरून दिले. पण वीज जोडणी करून दिली नाही.
कृषीपंप जोडणीची प्रतिक्षा यादी कोसरा शाखेत लावली आहे. पण येथे कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाने शेतकऱ्यांकडून हजारो रुपये घेऊन वीज खांब उभे केल्याची चर्चा आहे. या संबधी सहाय्यक अभियंता पवनी यांना विचारले असता प्रतिक्षा यादीतील अगोदरच्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन देल्याचे फोटो काढून आणा मग कारवाई करतो असे म्हणून वेळ मारून नेत आहेत. (वार्ताहर)
अवैध वीज कनेक्शन वाढले
कोंढा, कोसरा कार्यालयांतर्गत अनेक कृषीपंप सुरु आहे. एका कृषीपंपाच्या कनेक्शनवर २ मोटारपंप लावले जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे विजेवर चालणारे थ्रेशर मशीन आहेत. ते देखील रात्रीला अवैध कनेक्शन रब्बी पिकाची मळणी करीत आहे. अवैध कनेक्शन वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पकडले तर शेतकरी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पकडून आपले मोटारपंप, वायर, कार्यालयातून परत नेतात. अवैध वीज कनेक्शन घेणारे वीज कर्मचाऱ्यांना धमक्या देखील देतात. अधिकारी कार्यालयात राहत नसल्याने मदतनिस यांच्यावर कार्यालय व ग्राहकांना सांभाळावे लागते. तरी येथील कार्यालयात दोन्ही शाखा अभियंता यांनी हजर राहून ग्राहकांच्या समस्या सोडविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
कोसरा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता लक्ष्मीनारायण मेश्राम यांना काविळ आजार झाल्याने ते रजेवर आहेत. त्यांचा चार्ज माझेकडे आहे. मी आठवडी बाजार व इतर दिवशी पवनी येथून कोसरा कार्यालयात हजर असतो. कोंढा फिडर ज्या रोहित्रावर आहे त्यावर जास्त भार होत आहे. त्यामुळे बंद पडतो.यावर उपाय म्हणून नवीन १० एम.व्ही.ए. लावले आहे. त्यास विद्युत निरीक्षक यांनी तपासले असून त्यांचे प्रमाणपत्र आल्यानंतर ते सुरु करण्यात येईल. वीज जाण्याचे प्रकार थांबतील.
-पंकज मेश्राम
कनिष्ठ अभियंता, कोसरा.