दोन वर्षात केवळ घोषणाच

By Admin | Updated: June 6, 2016 00:25 IST2016-06-06T00:25:50+5:302016-06-06T00:25:50+5:30

केंद्र आणि राज्यात आलेल्या भाजप सरकारने दोन वर्षात स्किल इंडियापासून मेक ईन इंडियापर्यंत केवळ घोषणांवर घोषणाच केल्या आहेत.

Only in two years will the announcement be made | दोन वर्षात केवळ घोषणाच

दोन वर्षात केवळ घोषणाच

प्रफुल पटेल यांचा सरकारवर हल्लाबोल : भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केला जंगी सत्कार
भंडारा : केंद्र आणि राज्यात आलेल्या भाजप सरकारने दोन वर्षात स्किल इंडियापासून मेक ईन इंडियापर्यंत केवळ घोषणांवर घोषणाच केल्या आहेत. विकास मात्र शुन्य आहे. भंडारा जिल्हा जिथे आहे तिथेच आहे. विकासात एकही पाऊल पुढे पडलेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.
राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर सत्कार समारंभासाठी ते रविवारला भंडाऱ्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, दोन वर्षात ‘स्किल डेवलपमेंट’च्या नावावर काहीही झाले नाही. आमच्याकडे आयटीआयचे मुले नाहीत का? असा सवाल करून एकाही मुलाला रोेजगार मिळाला नाही. क्रिमीलेअर, ओबीसी शिष्यवृत्ती मिळाली नाही.
स्वच्छ भारतापेक्षा  स्वच्छ भाजप करा
राज्यात भाजपचे सरकार येताच पहिल्या चार महिन्यात चिक्की घोटाळा, त्यानंतरच्या चार महिन्यात शाळेत लावण्यात येणारे अग्निशामन यंत्र घोटाळा, तुर डाळ घोटाळा समोर येत आहे. मंत्र्यांवर आरोप होऊ लागले आहेत. आता दीड वर्षात एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे ‘स्वच्छ भारतापेक्षा स्वच्छ भाजप’ हे अभियान राबविण्याची गरज आहे.
आॅक्टोबर महिन्यात धान परिषद
मागील दोन वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. धानाला १,४७० रूपये भाव दिला जात आहे. केवळ ६० रूपये वाढविण्यात आले आहे. आमचे सरकार होते तेव्हा धानाला ४ हजार रूपये देण्याची मागणी करणारे आता दिसत नाहीत. आता चार वर्षांनी आम्ही ४ हजार रूपयेच द्या, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांना आम्ही वाचा फोडणार आहोत. त्यासाठी आॅक्टोबर महिन्यात धान परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसने केला जाहीर सत्कार
यावेळी खासदार प्रफुल पटेल यांचा राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भंडारा अर्बन बँक, भंडारा नगर परिषद, तुमसर नगर परिषद, दुध उत्पादक संघ, जिल्हा मजूर संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे , माजी प्रदेश उपाध्यक्ष मधुकर सांबारे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, भंडाराचे नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद सभापती नरेश डहारे, सभापती शुंभागी रहांगडाले, सामाजिक न्याय विभागाचे डॉ.सच्चिदानंद फुलेकर, माजी प्रदेश सचिव अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, पवनी पालिकेचे उपाध्यक्ष विजय ठक्कर, उद्योग संघाचे अध्यक्ष धनपाल चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे व विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(जिल्हा प्रतिनिधी)

गोसेखुर्द कसा होणार?
गोसेखुर्द हा देशातील एकमेव असा प्रकल्प आहे ज्यात केंद्राच्या एआयबीपी योजनेतंर्गत ९० टक्के निधी देण्यात आला. राज्याचा वाटा केवळ १० टक्के आहे. या प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकारने मागील दोन वर्षात एकही निधी दिला नाही. त्यामुळे अशा स्थितीत हा प्रकल्प पूर्ण कसा होणार? असा प्रश्ही त्यांनी केला. या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर आम्ही नवीन योजना राबवू, असे सांगितले होते. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही नवीन योजना आल्याचे दिसून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
भूमिपूजन झाले, निविदा नाही
जानेवारी महिन्यात गाजावाजा करून जिल्ह्यात हजारो कोटी रूपयांच्या रस्ते, पूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु आतापर्यंत या कामांच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. विकासाच्या नावावर चर्चा करणारे विकासाच्या मुद्यावर अयशस्वी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले.

Web Title: Only in two years will the announcement be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.