रोहयोच्या कामात आॅनलाईन घोटाळा
By Admin | Updated: February 18, 2015 00:32 IST2015-02-18T00:32:01+5:302015-02-18T00:32:01+5:30
रोजगार हमी योजनेंतर्गत साहित्य पुरवठा धारकांनी साहित्य पुरविले नसताना सुद्धा ६० लक्ष रूपयांचा आॅनलाईन घोटाळा करण्यात आला आहे.

रोहयोच्या कामात आॅनलाईन घोटाळा
साकोली : रोजगार हमी योजनेंतर्गत साहित्य पुरवठा धारकांनी साहित्य पुरविले नसताना सुद्धा ६० लक्ष रूपयांचा आॅनलाईन घोटाळा करण्यात आला आहे. याला जबाबदार असलेले रोजगार हमी योजना तांत्रिक पॅनेलचे सहायक कार्यक्रम अधिकारी, डाटा आॅपरेटर, खंडविकास अधिकारी लेखाधिकारी तसेच निविदाधारक यांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे कैलास गेडाम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
साकोली पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध गावातील पांदण रस्त्याच्या कामावर सन २०११-१२ मध्ये झालेल्या मुरूम कामात व विहीर बांधकामामध्ये फार मोठा आॅन लाईन घोटाळा करण्यात आला.
प्रत्यक्षात साकोली तालुक्यात महसूल रेकार्डप्रमाणे २८९ पांदण रस्ते असताना वर्ष २०११-१२ पासून आतापर्यंत ३६७ पांदण रस्ते दाखविण्यात आले व ३४२ पांदन रस्त्यावर मुरूम काम केल्याचे दाखविले. त्यामध्ये ५ कोटी ४२ लक्ष रूपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
साकोली पंचायत समिती अंतर्गत जांभळी/सडक विहीरगाव व इतर गावात वर्ष २०१३-१४ या आर्थिक वर्षात ६०-४० च्या नियमानुसार सिमेंट रोड, नाली बांधकाम यासारखी कामे करण्यात आली.
ही कामे प्राप्त निधीनुसार पूर्ण करून त्याची देयके देण्यात आली असतानाही पुन्हा त्याच कामात तरतूद करून निधी मिळविली व कामे न करता निविदा धारकांच्या खात्यावर आॅन लॉईन गैरव्यवहार करण्यात आला. ग्रामसेवक, सरपंच यांना कोणतीही माहिती न देता निधी वर्ग करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)