वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम निलंबित
By Admin | Updated: September 29, 2016 00:33 IST2016-09-29T00:33:09+5:302016-09-29T00:33:09+5:30
भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून कोका विश्रामगृहाच्या लाकूड साहित्यांची अफरातफर केली.

वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम निलंबित
प्रकरण लाकूड साहित्य अफरातफरीचे : कारवाईचे आदेश धडकले
प्रशांत देसाई भंडारा
भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून कोका विश्रामगृहाच्या लाकूड साहित्यांची अफरातफर केली. ‘लोकमत’मध्ये वृत्त मालीका प्रकाशित झाली. याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक पी.एस. रेड्डी यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणाने वनविभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ असलेल्या कोका येथील ब्रिटीशकालीन विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. यावेळी या विश्रामगृहाचे मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड साठा निघाला. हा लाकूड साठा गडेगाव लाकूड आगारात लिलाव करण्याचे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रवीणकुमार यांनी बजावले होते. मात्र त्यांची बदली होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांनी कोका येथील क्षेत्र सहाय्यक डब्लू. आर. खान यांना सदर लाकूड साठा भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयात पाठविण्याचे लेखी आदेश बजावले. वरिष्ठांचे आदेश डावलून मेश्राम यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत बोलाविलेल्या लाकूड साहित्यांची अफरातफर केली.
सदर प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरले. वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी सदर प्रकरण अंगलट येईल या भीतीने अफरातफर केलेला लाकूड साठा पुर्ववत वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात बोलाविला व त्यांना अधिकार नसतानाही सर्व लाकूड साठा त्यांच्या शासकीय वसाहतीत दडवून ठेवला. या प्रकरणाची वृत्तमालिका ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाली. यामुळे धास्तावलेल्या मेश्राम यांनी प्रकरण दडपण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्यात.
दरम्यान त्यांनी भंडारा येथून बदली करून घेण्याचाही प्रकार चालविला होता. मात्र या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यात मेश्राम हे दोषी आढळून आले. याचा अहवाल मुख्य वनसंरक्षक यांना पाठविण्यात आला.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन मुख्य वनसंरक्षक टी.एस. रेड्डी यांनी सोमवारला वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांनी लाकूड साहित्यांची अफरातफर केल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांच्या निलंबनाचे आदेश बजावले. दरम्यान त्यांना सदर आदेशाची बजावणी आज बुधवारला करण्यात आली. मेश्राम यांचे निलंबन करण्यात आल्यामुळे त्यांची वर्धा येथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्यालयात बदली करण्यात आल्याचेही निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वनविभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. मेश्राम यांचे अनेक प्रकरण ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणासह त्यांच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी होणे आता गरजेचे आहे.
क्षेत्र सहाय्यकाकडे प्रभार
भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा प्रभार कोका वनक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक डब्लू.आर. खान यांच्याकडे सोपविण्याचे आदेश असल्याने आज बुधवारला मेश्राम यांनी खान यांना प्रभार सोपविला आहे.
मनसेनेही थोपटले होते दंड
भंडारा उपवन संरक्षक कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत वृक्षांची कटाई व लाकूड साहित्यांची अफरातफर प्रकरण लोकमतमध्ये प्रकाशित झाले. याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनीही या प्रकरणी मेश्राम यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती. यासाठी त्यांनी उपवनसंरक्षक कार्यालयात घेराव घालून हल्लाबोल केला होता. दरम्यान महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष टी.एच. घुले यांनीही या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
‘त्या’ वृक्ष कटाईत मोठे मासे
उपवनसंरक्षक कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयातील सागवान व आडजात वृक्षांची परवानगीविना कटाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचीही चौकशी होणे आता गरजेचे आहे. परवानगीविना वृक्षांची कत्तल केल्याने वनसंवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वृक्षकटाई प्रकरणी वनविभागातील मोठे अधिकारी फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशीची आता गरज आहे.
मुख्य वन संरक्षक यांनी वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांच्या निलंबनाचे आदेश बजावले आहे. त्यांच्या आदेशानुसार मेश्राम यांचे वर्धा येथे रूजू होण्याचे आदेश बजावले असून त्यांचा प्रभार क्षेत्रसहाय्यक खान यांच्याकडे सोपविला आहे.
- उमेश वर्मा, उपवनसंरक्षक भंडारा
भंडारा वनविभागात मोठ्या प्रमाणात अफरातफर करण्यात येत आहे. मागील काही वर्षात या प्रकारात वाढ झाली आहे. मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी जिल्ह्यातील सर्व वनकर्मचाऱ्यांच्या प्रकरणांची चौकशी झाल्यास मोठे मासे गळाला लागतील. या प्रकरणात मनसे आता दंड थोपटणार आहे.
-विजय शहारे, जिल्हाध्यक्ष, मनसे