पहिल्या दिवशी शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती; विद्यार्थ्यांचा हिरमोड : शिक्षकांची शाळा भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:03+5:302021-06-29T04:24:03+5:30
मोहाडी : सोमवारपासून शाळा तर विद्यार्थ्यांविना सुरू झाल्या आहेत. शिक्षकांना मात्र शाळांतील उपस्थिती बंधनकारक आहे. इयत्ता दहावी निकाल तयार ...

पहिल्या दिवशी शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती; विद्यार्थ्यांचा हिरमोड : शिक्षकांची शाळा भरली
मोहाडी : सोमवारपासून शाळा तर विद्यार्थ्यांविना सुरू झाल्या आहेत. शिक्षकांना मात्र शाळांतील उपस्थिती बंधनकारक आहे. इयत्ता दहावी निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू आहे. त्यामुळे दहावीला अध्यापन करणारे शिक्षक दहा दिवसांपासूनच दररोज शाळेत येत आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती होती, तर विद्यार्थी मात्र ऑनलाईनच दिसले.
शाळांतील प्रवेशोत्सव, शाळेत पडणारे पहिले पाऊल, विद्यार्थ्यांची किलबिल, पुस्तकांचा दरवळणारा सुगंध, मित्रांच्या भेटी-गाठी, आनंददायी उपक्रम, पहिल्या दिवशीच्या अध्यापनानंतर मिळणारे जेवण हे सगळं कोरोनाने यावर्षीही हिरावून घेतले आहे. आजपासून शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली. शाळा सुरू झाल्या आहेत; पण त्या विद्यार्थ्यांनी बहरल्या नाहीत. मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता. यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाईनच करून घ्यावी लागेल.
शाळेच्या पहिल्या दिवशी केवळ शिक्षकांचेच शाळेत पाय पडले. कोरोना पूर्वी शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जात असे. या दिवशी उत्साहाला उधाण येत होते. पहिल्याच दिवशी मिळणाऱ्या पुस्तकांचा मंद सुगंध वर्गखोल्यांत दरवळत असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्गमित्रांची ताटातूट होत असे. शाळेचा पहिला दिवस कधी उजाडतो याची प्रतीक्षा केली जायची. शाळेचा पहिला दिवस मित्रांच्या भेटी-गाठीने अन् वर्गमित्रांच्या छोट्या मैफिलीने रंगत असे. नवीन मित्र जोडले जात असत. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीयच असायचा. शाळा व्यवस्थापन करणारे मुख्याध्यापक, शिक्षक पहिल्या दिवशी मुलांना गोड जेवण घालायचे. तथापि, शाळेत येण्याची हुरहुर, शाळेत येण्याने होणारा किलबिलाट हे सगळे शाळेतले उत्साहवर्धक वातावरण कोविड-१९ ने दोन वर्षांपासून हिरावून घेतले आहे. मर्यादित वेळेत यंदा निकाल जाहीर करायचे असल्याने राज्यातील विदर्भासह इयत्ता दहावी, बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांची शाळांमध्ये १०० टक्के उपस्थिती गरजेची असल्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या होत्या.