एक दिवस जीवाभावाच्या मैत्रीचा...

By Admin | Updated: August 7, 2016 00:19 IST2016-08-07T00:19:02+5:302016-08-07T00:19:02+5:30

अशी असावी मैत्री...... ओला पाऊसच काय...

One day the friendship of living ... | एक दिवस जीवाभावाच्या मैत्रीचा...

एक दिवस जीवाभावाच्या मैत्रीचा...

* आज मैत्री दिवस *
प्रशांत देसाई भंडारा
अशी असावी मैत्री......
ओला पाऊसच काय
थेंब थेंब ही चिंब होईल
अशी मैत्री.......तुझी - माझी
आॅगस्टचा पहिला रविवार असो किंवा कॉलेजचा पहिला दिवस, पावसाळ्यात नव्या मैत्रीचे नवे दिवस सुरु होतात. कारण ते दिवस नवे असतात, ते वर्ष नवे असते अणी तो अभ्यासक्रमही नवाच असतो. कॉलेज कँपस नवनव्या मित्रांनी फुलून येते. तिथूनच मग मैत्रीचे नवे जग सुरू होते. नव्याने मनांची चाचपणी केली जाते. काही लगेचच जुळतात, काही वेळ घेतात तर काही मने नुसतीच छळतात, प्रसंगी जळतातसुद्धा!
एकंदर आठवणीत राहते ती कॉलेजचीच मैत्री. त्या वयात जाण आलेली असते. भल्याबुऱ्यांची समज कळत जाते. अपने-पराये देखील ओळखता येत असतात. हीच मैत्री जीवनभर सोबतीला येते. या आठवणी आयुष्यभर पुरतात, वेळी अवेळी स्मरतात अणी कधी कधी त्या मैत्रीसाठी छानशा ओळीही स्फुरतात. तर अशी ही मैत्री अवीट गोडीची, अजोड जोडीची अन् अनिवार ओढीची..
अतुलनीय तो पाऊस-वारा
नाते असे हे तुझे - माझे
देव बांधितो ती नाती
नाही कुठल्या बंधनाने तूटे
अटूट नाते हे तुझे - माझे
या मैत्रीने आम्हांस काय दिलं? मित्रत्वाचं मोठ्ठं सर्कल दिलं, मित्रप्रेम चिरकाल दिलं अन् शाश्वताचं भान हरकाल दिलं. मित्रांनी जशा चांगल्या गोष्टी दिल्या तशा वाईट वाटाही दाखवल्या. काही मित्र सोवळे होते तर काही फार निराळे होते. काही ‘असे’ होते, काही ‘तसे’. ‘अशां’च्या जवळ जातांना बिकट वहिवाट दिसायची तर ‘तशां’च्या सान्निध्यात धोपट मार्गाने जाऊन चुकणं व्हायचं, तरीही पुन्हा धडपडत वाटेवर यायचं, यात कमालीचा रोमांच होता. जीवनपथाचा प्रत्येक मैल असल्या अविस्मरणीय दगडांनी पूर्ण झालाय...
नसे हा दिवस फक्त साजरा करण्यासाठी
नसे हे नाते फक्त दाखवण्यासाठी
आहे हे नाते तुझे - माझे
कधी न टूटणारे ‘अटूट नाते’
अशी असावी मैत्री
मैत्री तुझी - माझी..........
मैत्रिणीही होत्या! खळाळून हसणाऱ्या, मुळुमुळू रडणाऱ्या, कोणाच्यातरी आठवणींत कुढणाऱ्या. त्यातील काही अकालीच विखुरल्या, काही अज्ञातवासात शिरल्या तर काही आजपर्यंत पुरून उरल्या! त्या आजही फोन करतात, आयुष्याची उजळणी मांडतात, ‘ते दिवस मजेचे होते’ असेही अश्रू त्या कधीकधी सांडतात. त्यांना धीर देणं हे एकच काम आता उरतं. हे आयुष्य असंच बेफिकीरपणे पुढे संपत जातं याची जाणीव करून द्यावी लागते. परंतु तरीही त्या सर्वांची उणीव प्रकर्षाने जाणवत रहाते. वाटतं, ही मैत्रीही खूपच परीक्षा पाहते...
जीवनभराचे मित्र आणि मैत्रिणींना आयुष्यात ही मैत्री टिकावी यासाठी ही एक परिक्षाच आहे. या सर्व परिक्षार्थींना मैत्रदिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा द्याव्याशा वाटतात! देऊ यात...
दिवस साजरा करू ‘फ्रेंडशिप डे’
साजरे करूनी आपले नाते
साजरी करूनी आपली मैत्री
अविस्मरणीय बनवूनी तो दिवस
जगू आयुष्यातील प्रत्येक दिवस ‘फ्रेंडशिप डे’

Web Title: One day the friendship of living ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.