रहदारीपूर्वीच दीड कोटींचा रस्ता खचला
By Admin | Updated: October 22, 2015 00:39 IST2015-10-22T00:38:05+5:302015-10-22T00:39:07+5:30
मॉयल प्रशासनाने सहा महिन्यापूर्वी रस्त्याचे बांधकाम करून रस्त्याच्या मधोमध मातीचे ढिगारे ठेवल्याने जड व हलके वाहनांना वाहतूक बंद केली.

रहदारीपूर्वीच दीड कोटींचा रस्ता खचला
सीएसआर निधीचा दुरूपयोग : मॉयल प्रशासनाचा ढिसाळ कारभार
तुमसर : मॉयल प्रशासनाने सहा महिन्यापूर्वी रस्त्याचे बांधकाम करून रस्त्याच्या मधोमध मातीचे ढिगारे ठेवल्याने जड व हलके वाहनांना वाहतूक बंद केली. मात्र यावर्षीच्या पावसामुळे पुलालगतचा तयार रस्ता खचल्याने मॉयल प्रशासनाचे पितळ उघडे पडले.
मॉयल कर्मचाऱ्यांच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे याकरिता चिखला मॉयल प्रशासनाने ‘डीएव्ही’ची सीबीएसई पॅटर्नची शाळा सितासावंगी येथे उघडण्यात आली. त्याकरिता मॉयल प्रशासनाने सीएसआर (जीवन दायीत्व योजनेतून) ७ कोटी रूपये ईमारत बांधकामाकरिता खर्ची घालून ईमारत मॉयलच्या सितासावंगी येथील कार्यालयाजवळ उभारला.
बाहेरिल कर्मचाऱ्याचे पाल्यांना शाळेत येण्याकरिता जास्तीचे अंतर कापावे लागत असल्याने डीएव्ही शाळा ते तुमसर-नाकाडोंगरी राज्य मार्ग क्रमांक ७२ ला जोडणारा १४०० मीटर अंतराचा रस्ता डांबरीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार जीवन दायीत्व योजनेतून दीड कोटी रूपये मंजुर केले गेले.
त्यानुसार रस्त्याचे डांबरीकरण व ब्रिटीशकालीन पुलाचे नुतनीकरण होते.
सदर बांधकाम मॉयल प्रशासनाने लगीन घाई करून उरकवून घेतला परंतू त्या रस्त्याच्या मधोमध मातीचे मोठ मोठे ढिगारे ठेवून पावसाळापुर्वी तयार झालेला रस्ता बंदच ठेवला. दरम्यान पावसाळा सुरू होताच पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबर वाहून गेले तर पुलालगत दगळानी पिचिंग बरोबर न केल्याने दगळ निसटले व रस्ता आपोआपच खचत गेला.
ही बाब मॉयल प्रशासनाच्या लक्षात येताच सुरूवातीला सिमेंट कांक्रीटची लिपापोती केली व नंतर वाकलेले तारे ओढून त्याच रस्त्यावरील दुरूस्तीकरिता २५ लक्ष रूपयांची निविष्टा देऊन डबल मलाई खाल्याचा प्रकार मॉयल प्रशासनाकडून होताना दिसत आहे.
ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी मॉयल प्रशासनाला सुचना दिल्या परंतु आमचा पैसा आम्ही काहीही करू अशी भूमिका मॉयल प्रशासनाने घेतली परंतु मॉयल ही भारत सरकारचा उपक्रम आहे. त्यामुळे मॉयलची निधी किंवा अन्य हे सार्वजनिक संपत्ती असल्याने तिचे सांभाळ करणे हे जनतेचे कर्तव्य असल्याने परिसरातील नागरिकांनी मॉयलच्या वरिष्ठांना निवेदन पाठवून चिखला मॉयल येथील भ्रष्टाचाराची माहिती दिली.
याबाबद चिखला मॉयल मॅनेजर विकास परिदा यांच्याशी संपर्क साधला असता ते सुट्यांवर गेल्याचे समजते व त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. (शहर प्रतिनिधी)