दीड लक्ष नागरिकांचे आरोग्य संकटात

By Admin | Updated: June 12, 2017 00:27 IST2017-06-12T00:27:21+5:302017-06-12T00:27:21+5:30

जीवनदायीनी वैनगंगा नदीच्या दूषित पाण्यामुळे दीड लक्ष भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

One-and-a-half-lakhs people suffer from health problems | दीड लक्ष नागरिकांचे आरोग्य संकटात

दीड लक्ष नागरिकांचे आरोग्य संकटात

दूषित पाणीपुरवठा कायम : नदीपात्रात इकॉर्नियाचे थैमान
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जीवनदायीनी वैनगंगा नदीच्या दूषित पाण्यामुळे दीड लक्ष भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी आणि जलपर्णी वनस्पती (इकॉर्निया) यामुळे वैनगंगेचे पाणी अधिकच दूषित झाले आहे. शहराला लागून असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात इकॉर्निया वाढला असून काठावरही गाळ साचला आहे.
केंद्र शासनाने नदी शुध्दीकरणाचा नारा दिला असला तरी आजपर्यत कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना अद्यापही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरु असल्याने पाणी सिंचीत राहू लागले आहे.
नागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. हेच पाणी गोसे धरणात जाते. मागील महिन्यात वैनगंगा नदीचे पाणी धरणातून सोडण्यात आले.
धरणालगतच्या हायड्रो प्रोजेक्टची कामे सुरू आहेत. त्यासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र इकॉर्नियाची स्थिती जैसे थे. दुसरीकडे वैनगंगा नदीेच्या स्वच्भतेसाठी ‘निरी’ मदत करणार होती. वैनगंगा नदी काठाचा परिसर स्वच्छ करण्यात येणार होता. यासर्व योजना कागदावरच राहिल्या.
नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून सांडपाणी नागनदीच्या पात्रात सोडण्यात येते. नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेत मिसळते. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे.
धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी पाण्याने भरली आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे.
पवनी व भंडारा येथे नगरपरिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारचा रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे नदीकाठावरील बऱ्याच गावांमध्ये जलशुद्धीकरण सयंत्र नसल्याने अशुद्ध पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.
दूषित पाण्यामुळे काही लोकांच्या अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे येणे आदी प्रकार दिसून येत आहेत.
ग्रामपंचायतमार्फत याच नदीतील पाणी गावातील लोकांना पिण्यासाठी पुरविले जाते. फिल्टरची खास सोय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या दूषित पाण्यापासून फारच धोका निर्माण झाला आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: One-and-a-half-lakhs people suffer from health problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.