चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला

By Admin | Updated: May 29, 2014 23:47 IST2014-05-29T23:47:20+5:302014-05-29T23:47:20+5:30

मागील तीन महिन्यापासून सिहोरा परिसरात भरदिवसा वयोवृद्ध महिलांना टारगेट करीत दागिने लुटत आहेत. परंतु या अज्ञात चोरट्यांचा पोलिसांना अद्याप सुगावा लागलेला नाही.

Older women on the thieves's challenge | चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला

चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला

कानातील डूल पळविले : अज्ञात चोरट्याचे रेखाचित्र जारी
चुल्हाड (सिहोरा) : मागील तीन महिन्यापासून सिहोरा परिसरात भरदिवसा वयोवृद्ध महिलांना टारगेट करीत दागिने लुटत आहेत. परंतु या अज्ञात चोरट्यांचा पोलिसांना अद्याप सुगावा लागलेला नाही. दरम्यान मांगली गावात या चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने गावकर्‍यांच्या सांगण्यावरून अज्ञात चोरट्याचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे.
याप्रकारामुळे सिहोरा परिसरातील नागरिक दहशतीत वावरत आहेत. अज्ञात चोरट्यांनी घरातील वयोवृद्ध महिलांना लक्ष्य केले आहे. एरव्ही रात्री होणार्‍या चोर्‍या आता दिवसा होत असल्याने गावागावात दहशतीचे चित्र आहे. महिलांच्या अंगावरील दागिने लुटत आहेत. घरातील कमावते व्यक्ती रोहयोच्या कामावर जात असल्यामुये या संधीचा फायदा अज्ञात चोरटे घेत आहेत. आधी स्कार्फ बांधून हे चोरटे गावात फिरत असायचे. आता विना क्रमांकाच्या दुचाकीने गावात फिरत असून घरात कुणी नसल्याची संधी साधून हे चोरटे वयोवृद्ध महिलांना पिण्याचे पाणी मागतात. यादरम्यान गळ्यातील दागिने ओढून पसार होत आहेत. आता तर या चोरट्यांनी नवा फंडा शोधून काढला आहे. वयोवृद्ध महिलांना मुलांचा अपघात झाल्याचे सांगून स्वत:च्या दुचाकीने नेऊन लूटत आहेत.
देवसर्रा येथील मीराबाई बिसने (७0) ही महिला बसस्थानकावर उभी असताना एका अज्ञात दुचाकी चालकाने तुझ्या मुलाचा अपघात झाला, असे सांगून दुचाकीवर बसविले. या महिलेला गोंडीटोला गावाच्या दिशेने आणले. रस्त्यावर तिच्या कानातील सोन्याचे टॉप्स ओढल्याने कान तुटले. याचवेळी गळ्यातील एकदानी घेऊन तो चोरटा पसार झाला.
त्यानंतर या चोरट्याने मांगली गावात हजेरी लावली. गावातील नितीन रिनायते यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी पाणी मागितले. परंतु घरातील सदस्य असल्याने फसवणूक करण्याचा प्रयत्न या चोरट्यांकडून झाला नाही. लाल रंगाचा शर्ट घातलेला २५-३0 वयाचा हा अज्ञात चोरटा सिहोरा गावाच्या दिशेने निघाला. गावानजीकच्या नाल्यावर शेतातून घराकडे जात असलेल्या देवकनबाई शरणागत यांना रस्त्यात अडविले. या महिलेला तुझ्या मुलाचा अपघात झाला असून तातडीने रुग्णालयात जायचे आहे, असे सांगून दुचाकीवर बसविले. काही अंतरावर गेल्यानंतर महिलेने चोरट्याला कोणत्या मुलाचा अपघात झाला, असे विचारले असता तो चोरटा चक्रावला. दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच देवकनबाईने आरडाओरड केल्यामुळे अनर्थ टळला.
वाढत्या घटनांमुळे नागरिक दहशतीत आले आहे. गावात पाणी मागणार्‍या या अज्ञात चोरट्याचे गावकर्‍यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी रेखाचित्र जारी केले आहे. या चोरट्याच्या टोळीत २-३ तरुणांचा समावेश आहे. हे चोरट्या वृद्ध महिलांना भूलथापा देऊन लुटत आहेत. नागरिकांनी अशा अज्ञात तथा अनोळखी तरुणांपासून सावध राहण्याची गरज आहे. असे तरुण कुठे आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ सूचना द्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांनी केले आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Older women on the thieves's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.