वृद्ध दाम्पत्य घरकुलाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: November 4, 2015 00:39 IST2015-11-04T00:39:44+5:302015-11-04T00:39:44+5:30
पवनी पंचायत समिती अंतर्गत पालोरा आबादी येथील पुंडलिक मेश्राम यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते पक्के घर बांधू शकत नाही.

वृद्ध दाम्पत्य घरकुलाच्या प्रतीक्षेत
पालोरा (चौ.) : पवनी पंचायत समिती अंतर्गत पालोरा आबादी येथील पुंडलिक मेश्राम यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते पक्के घर बांधू शकत नाही. मागील अनेक वर्षापासून मोडक्या झोपडीवजा घरात म्हाताऱ्या पत्नीसह वास्तव्य करीत आहेत. घरकूल योजना मिळावी म्हणून येथील ग्रामपंचायत प्रशासनाला अर्ज सादर केला आहे. मात्र, त्याच्या अर्जाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
मानवाच्या तीन गरजा पैकी निवारा ही एक अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे. येथील मेश्राम कुटुंबीयांना हिवाळ्यात थंडी, पावसाळ्यात पाऊस व उन्हाळ्यात कडक उन्हाचा सामना करावा लागतो. ज्यांना घरकुल योजनेची गरज नाही, अशा धनाढ्य लोकांना ग्रामपंचायतीकडून घरकूल देण्यात आलेले आहे. घरकूल योजनेच्या पैशाची उचल करून अनेकांनी कागदोपत्री घर बांधल्याचे दाखविले असले तरी, प्रत्यक्षात मात्र गुरांसाठी गोठा बांधला आहे. तर अनेकांनी बांधकामच केले नाही.
पडके घर असल्यामुळे ते केव्हाही कोसळून जीवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत पुंडलिक आपल्या म्हाताऱ्या पत्नीसह वास्तव्य करीत आहे. घरकुलाची गरज असल्याने त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला आहे. मात्र, त्यांच्या अर्जावर आजपर्यंत तोडगा निघालेला नाही. निवडणुकीच्या दरम्यान यांना अनेकांनी घरकूल देऊ म्हणून आश्वासन दिले होते. मात्र, मत मिळाल्यावर कोणीच त्यांच्याकडे फिरकले नाही. पावसाळ्यामध्ये संपूर्ण घर गळते घरात पाण्यामुळे चिखल तयार होतो. रात्रभर घरातले पाणी बाहेर फेकून चिखलावर पोते टाकून राहावे लागत आहे. घराचे लाकळी फाटे जीर्ण झाले आहेत. त्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)