जुना कारधा पुलावरील वाहतुकीस प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 00:17 IST2016-08-10T00:17:13+5:302016-08-10T00:17:13+5:30
लोकांच्या जिवितास हानी तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात व दुर्घटना टाळण्यासाठी वैनगंगा नदीवरील राष्ट्रीय महामार्ग ...

जुना कारधा पुलावरील वाहतुकीस प्रतिबंध
अधिसूचना जारी : जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले निर्देश
भंडारा : लोकांच्या जिवितास हानी तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात व दुर्घटना टाळण्यासाठी वैनगंगा नदीवरील राष्ट्रीय महामार्ग सहावर असलेल्या जुन्या कारधा पुलावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध घालणारी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी ८ आॅगस्ट रोजी जारी केली आहे. ही अधिसूचना तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आलेली आहे.
रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूर यांनी वैनगंगा नदीवरील जुना कारधा पुल हा १९२८ साली बांधण्यात आला असून सद्यस्थितीत पुलाचे स्तंभ हे पाण्याखाली असल्याने पुलाचे संपूर्ण निरीक्षण व स्थायत्य परिक्षण न झाल्याने सदर पुलावर दुर्घटना होवू शकते असे जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सदर पुलावरून वाहतुकीस प्रतिबंध घालणारी अधिसूचना जारी केली आहे.
जुना कारधा पुलास २००१ पासून मोठा नवा पर्यायी पुल कार्यान्वित आहे म्हणून जुन्या कारधा पुलाची दोन्ही बाजूची वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे. नागरिकांनी यापुढे जुन्या कारधा पुलाचा वापर न करता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी नवीन पुलाचा वापर करावा असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. ही अधिसूचना तात्काळ प्रभावाने अमलात आली आहे. (शहर प्रतिनिधी)