पदाधिकाऱ्यांचा ‘शेड्यूल बिझी’

By Admin | Updated: October 8, 2014 23:20 IST2014-10-08T23:20:11+5:302014-10-08T23:20:11+5:30

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतील पदाधिकारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त झाले आहेत. विधानसभा निवडणूक आठ दिवसांवर आली आहे.

Officials 'Schedule Business' | पदाधिकाऱ्यांचा ‘शेड्यूल बिझी’

पदाधिकाऱ्यांचा ‘शेड्यूल बिझी’

जिल्हा परिषदेत शुकशुकाट : अधिकारी कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामात नियुक्ती
भंडारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतील पदाधिकारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त झाले आहेत. विधानसभा निवडणूक आठ दिवसांवर आली आहे. यात कार्यकर्ते व पदाधिकारी मागे नाहीत. ग्रामीण विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आणि शहराचा कणा मानल्या जाणाऱ्या नगर पालिकेतही हीच स्थिती आहे. एरव्ही गजबजलेल्या जिल्हा परिषद आणि नगर पालिकेत शुकशुकाट दिसत असून सदस्य व पदाधिकारी निवडणूक कामात व्यस्त झाले आहेत.
भंडारा जिल्हा परिषदेत भाजपाची तर नगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य भाजपच्या तर पालिकेचे सदस्य राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी लागले आहेत. याशिवाय जिल्हा परिषद आणि नगर पालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना या पक्षाचेही सदस्य स्वपक्षीय आणि समर्थक उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त दिसत आहेत. निवडणुकीमुळे जिल्हा परिषद व नगर परिषदेत सद्यस्थितीत कोणताही सदस्य फिरताना दिसत नसल्याचे चित्र आहे. सभापतींचीसुद्धा हीच स्थिती आहे. नगर परिषद व जिल्हा परिषदेचे सदस्य हे समर्थक उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरत आहेत तर काही पाय ओढण्यासाठी ताकद खर्ची घालत आहेत.
जिल्हा परिषदेत शुकशुकाट
मागील आठवड्यापासून रणधुमाळी सुरू झाली असल्याने दुसऱ्या टप्प्यात पोहचलेल्या प्रचारात रंग चढू लागला आहे. निवडणुक होईपर्यंत कदाचित हे पदाधिकारी जिल्हा परिषदेकडे फिरकणार नसल्याने काम घेऊन येणाऱ्यांचीही वाणवा आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयात शुकशुकाट दिसत आहे.
जिल्हा परिषदेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर प्रतिनिधीने मंगळवार आणि बुधवारला फेरफटका मारला असता, सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ग्रामीण नागरिकांच्या कामांचे हक्काचे ठिकाण असलेल्या जिल्हा परिषदेत ऐरव्ही रेलचेल असते. जिल्हा परिषद सदस्य किंवा पदाधिकाऱ्यांच्या भरवशावर येथे अडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुक आयुक्तांनी निवडणुकीची तारीख घोषित करताच आचारसंहिता लागू झाली. त्यापर्वी आचारसंहितेचा बडगा येणार असल्याने सर्व जिल्हा परिषद सदस्य तथा पदाधिकारी खोळंबलेल्या कामांचे नियोजन व धनादेश काढण्याच्या कामासाठी नित्याने दिवसभर हजेरी लावत होते. आचारसंहितेपूर्वी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या सहयोगाने कामांचे नियोजन करुन ते मार्गी कसे लावता येईल याचा विचार करण्यात आला. मात्र आचारसंहिता लागु होताच कामांचे नियोजन व झालेल्या कामांचे धनादेश काढता येत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे येणे टाळले आहे.
युती आणि आघाडी तुटल्याने सर्व पक्ष स्वत:च्या ताकदीने निवडणुकांना सामोरे जात आहेत. विधानसभेचे पडघम वाजताच पक्षांच्या आदेशानुसार पदाधिकारी उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या क्षेत्रात कामाला लागले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विविध विषय समितीचे सभापती हे पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त दिसत आहेत. हे सर्व पदाधिकारी मागील आठवड्यापासून निवडणुकीत सहभागी झाल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे येणे बंद केले आहे.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात कामासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी होती. कामासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्यांची येथे रेलचेल राहत असल्याने पदाधिकारीही वेळेवर मिळत होते. मात्र निवडणुकीमुळे पदाधिकारी येथे मिळत नसल्याने नागरिकांचेही भटकणे दुरापस्त झाले आहे. मिनी मंत्रालयाचे पदाधिकारी निवडणुकीत सहभागी असल्याने त्यांचे वाताणुकूलीत कक्ष उघडे आहे. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने त्यांच्या कक्षातील विद्युत रोषणाईमुळे ते चमकून उठत होते. मात्र सध्या तिथे कोणीच भटकत नसल्याने अंधाराची प्रचिती येत आहे. पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी व तेथील अंधाराचा फायदा काही मंडळी गैरकामासाठी करीत असल्याचेही बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Officials 'Schedule Business'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.