चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
By Admin | Updated: July 5, 2014 23:23 IST2014-07-05T23:23:41+5:302014-07-05T23:23:41+5:30
लाभार्थ्यांना कल्याणकारी योजनांच्या चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करा, असे निर्देश जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार

चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
दक्षता समितीची बैठक : नाना पटोले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
भंडारा : लाभार्थ्यांना कल्याणकारी योजनांच्या चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करा, असे निर्देश जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार नाना पटोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परिषद सभागृहात दक्षता व सनियंत्रण समितीचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जेजूरकर उपस्थित होते.
इंदिरा आवास योजनेचा आढावा घेताना भंडारा जिल्ह्यात अनुसूचित जाती जमातीची प्रतिक्षा यादी संपलेली आहे, अशी चुकीची माहिती अधिकारी लाथार्थ्यांना देतात, ही माहिती पटोले यांना मिळाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. जिल्ह्यातील गरीबांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करू नये, असा समजही त्यांनी दिला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये मजुरांचे खाते उघडले नसल्याची तक्रार करण्यात आली होती. यावर्षी सर्व मजुरांचे बँक खाते उघडण्यात आले असून त्यांचे वेतन इलेक्ट्रॉनिक्स वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे थेट मजुरांच्या खात्यात जमा होत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी दिली. ११ टक्के मजुरांचे वेतन वेळेवर झाले आहे .या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून देशात सातव्या क्रमांकावर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी अध्यक्षांना दिली.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील ज्या रस्त्यांचे मातीकाम व खडीकरण झाले आहे. मात्र डांबरीकरण झालेले नाही अशा रस्त्यांचा प्रस्ताव तयार करावा. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अशा कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरणाचा प्रस्ताव घेण्यात येईल. तसेच कोणकोणत्या मार्गावर पुलांचे बांधकाम करावयाचे आहे याची माहिती सुद्धा एकत्रित करून प्रस्ताव तयार करावा अशा सूचना अध्यक्षांनी संबंधित विभागाला दिल्यात.
सर्व विभागांनी त्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या कामाचा अजेंडा तयार करावा. तसेच जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी काम करावे, असे निर्देश नाना पटोले यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला सर्व पंचायत समिती सभापती, विभागप्रमुख, तहसीलदार, खंडविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.