अधिकाऱ्यांचे कक्ष हायफाय अन् कर्मचाऱ्यांच्या घरांवर ताडपत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:21 IST2021-03-29T04:21:52+5:302021-03-29T04:21:52+5:30
विशाल रणदिवे अड्याळ : गेली चार वर्षांपासून अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील गावात विविध प्रकारच्या लहान-मोठ्या घटना घडत ...

अधिकाऱ्यांचे कक्ष हायफाय अन् कर्मचाऱ्यांच्या घरांवर ताडपत्री
विशाल रणदिवे
अड्याळ : गेली चार वर्षांपासून अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील गावात विविध प्रकारच्या लहान-मोठ्या घटना घडत असतात. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आजही बिकट स्थितीत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे कक्ष हायफाय अन् कर्मचाऱ्यांच्या घरांवर ताडपत्री अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
अड्याळ पोलीस स्टेशनअंतर्गत ७९ गावांचा कारभार सांभाळला जातो. या ठिकाणी फक्त तीन अधिकारी व तीस पोलीस कर्मचारी आहे. त्यातही साप्ताहिक रजेवर तथा किरकोळ रजेवर जाणाऱ्या पोलीस कर्मचारी यांची संख्या ही जास्तीत जास्त मग उरलेल्या पोलीस कर्मचारी यांनी ७९ गावांतील काम कसे आणि कोणत्या प्रकारे हाताळायचे हाही एक मोठा प्रश्न आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हा पोलीस ठाण्याचा कारभार चालतो त्यांच्या घरावरील छतावर आजही मोठमोठ्या प्लॅस्टिक ताडपत्री घातल्या दिसतात. अधिकारी कक्षेची मात्र सरबराई सुरू झाली आहे. पोलीस ठाण्यात ३३ पैकी फक्त बारा पोलीस कर्मचारी व एक अधिकारी मिळून तेरा पोलीस स्टेशनच्या जागेत राहतात. बाकीचे दोन अधिकारी व १९ पोलीस कर्मचारी किरायच्या खोलीत गावातील ठिकठिकाणच्या किरायाच्या घरात वास्तव्यास असतात. जे पोलीस कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून पोलीस स्टेशनच्या क्वाॅर्टरमध्ये राहतात तेथील सिमेंट पत्रे तुटले असल्याने छतावरून पाणी गळू नये म्हणून अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या छतावर ताडपत्री घालून ठेवली आहे. पण असे किती दिवस चालणार हाही एक प्रश्न आहे आणि याकडेसुद्धा जिल्हा पोलीस प्रशासन आज नाही तर उद्या लक्ष घालणार असे बोलले जाते; पण शेवटी असे किती दिवस चालणार हीच स्थिती जर अधिकाऱ्यांच्या बाबतीत असती तर मग समस्या दूर तात्काळ झाली असती की नसती? विविध प्रकरण व त्यांच्या शोधात जाणारा वेळ, त्यांचा तपास, शोध इत्यादी कामाने येथील पोलीस कर्मचारी तथा अधिकारीसुद्धा वैतागून जातात; पण शेवटी काम करताना दिसतात. पोलीस स्टेशनमधील बगिचा असो वा पोलीस कर्मचारी यांचे क्वाॅर्टर या दोघांच्या तथा येथील पोलीस कर्मचारी संख्या याकडेसुद्धा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने आता तरी कोणती काळजी घातली जाते, याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागून आहे.