अधिकारी, कर्मचारी निवडणूक भत्त्यापासून वंचित
By Admin | Updated: August 8, 2015 00:49 IST2015-08-08T00:49:05+5:302015-08-08T00:49:05+5:30
अलीकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी कर्तव्यावर असणाऱ्या मतदान कर्मचारी, ....

अधिकारी, कर्मचारी निवडणूक भत्त्यापासून वंचित
ग्रामपंचायत : पुरेसा निधी नसल्याची स्पष्टोक्ती
तुमसर : अलीकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी कर्तव्यावर असणाऱ्या मतदान कर्मचारी, झोनल अधिकारी व निवडणूक अधिकारी यांना निवडणूक भत्ताच अदा करण्यात आला नाही. निवडणूकीत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांत मोबदल्याविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी भत्ता दिला जातो. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यरत कर्मचाऱ्यांना अपुरा भत्ता देण्यात आला. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीकरिता एकूण १७ लाख रूपयांचा निधी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत प्राप्त झाला होता. त्यात १३ लक्ष रूपये जिल्हा परीषद निवडणूक कर्मचारी यांचे संपूर्ण भत्ते अदा करण्यात आले. तर ग्रामपंचायत निवडणूक कर्मचाऱ्यांचे ५० टक्केच भत्ते अदा करण्यात येवून उर्वरित रक्कमेतून स्टेशनरी खर्च, मंडप, साऊंड सर्विस, खुर्च्या, गाड्याचे डिझेल व निवडणूक अनुषंगिक खर्चील्या गेले. मात्र ग्रामपंचायती निवडणुकीकरिता स्वतंत्र निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झाल्यानंतर कर्मचारी प्रशिक्षणाकरिता प्रवास खर्च तसेच निवडणुकीच्या मतदानाच्या आधी एक दिवस कर्मचाऱ्यांना साहित्य घेण्यासाठी जाण्याचा दिवसाचा प्रवासखर्च, रात्रीचे जेवण आदी असे प्रत्येक कर्मचाऱ्याला ८०० ते एक हजार रूपयाचा हा अतिरिक्त भुर्दंड बसला. निवडणूक भत्ताही अपुरा मिळाल्याने भत्ता गेला कुठे, असा प्रश्नाची कुजबुज सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)