अधिकारी बंगल्यात... पोलीस पाटील गस्तीवर
By Admin | Updated: November 9, 2014 22:27 IST2014-11-09T22:27:32+5:302014-11-09T22:27:32+5:30
मागील काही दिवसांपासून पोलीस पाटील डोळ्यात तेल घालून दिवसरात्र रेतीची सुरक्षा करीत आहेत. असे असताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून महसूल प्रशासनाने त्यांना सुरक्षा

अधिकारी बंगल्यात... पोलीस पाटील गस्तीवर
भंडारा : मागील काही दिवसांपासून पोलीस पाटील डोळ्यात तेल घालून दिवसरात्र रेतीची सुरक्षा करीत आहेत. असे असताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून महसूल प्रशासनाने त्यांना सुरक्षा साधनांची व्यवस्था केलेली नाही. पोलीस पाटील रात्र जागून काढत असून अधिकारी बंगल्यावर खुशाल झोपत असल्याने खडा पहारा देणाऱ्या पोलीस पाटीलामध्ये असंतोष पसरला आहे.
जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. गौण खनिज रेतीचे अवैध उत्खनन करून शहरालगत असलेल्या टाकळी परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे जमा करण्यात आलेले आहेत. रेती तस्करांकडून ही रेती मध्यरात्रीच्या सुमारास वाहतूक करण्यात येते. यावर निर्बंध घालण्याकरिता महसूल विभागाने पोलीस पाटलांची नियुक्ती केली आहे.
भंडारा तालुक्यातील मौजा खैरी, मांडवी, सुरेवाडा, करचखेडा, गोसावी, निर्वाण, जमनी, दाभा, लावेश्वर, कोथुर्णा, कोंढी, लोहारा, पेवठा आदी नदीघाटातून रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच त्यावर काही अंशी निर्बंध घालण्यात आले. मात्र रेतीमाफियांनी रेतीचे उत्खनन बंद केले नाही. नदीतून उत्खनन केलेली वाळू भंडारा शहरालगत असलेल्या टाकळी परिसरात साठवून ठेवली आहे. ही रेती मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या ट्रकांमध्ये भरून विक्रीला पाठविण्यात येते. ही बाब लक्षात येताच महसूल विभागाने यावर निर्बंध घालण्यासाठी भंडारा शहरातील शास्त्री चौक, कारधा टोल नाका, ग्रामसेवक कॉलनी येथे तपासणी नाके सुरु केले आहेत. या तपासणी नाक्यांवर वेगवेगळ्या पाळीत पोलीस पाटलांची नियुक्ती केलेली आहे.
रेती माफियांकडून मिळत असलेल्या धमक्यांपासून महसूल विभागाने त्यांना संरक्षण न देता केवळ आश्वासन दिले आहे. माफियांकडून येत असलेल्या धमक्यांमुळे पोलीस पाटील जीव मुठीत घेऊन आपली जबाबदारी पार पाडीत आहेत. महसूल विभागाच्या या कर्तव्यावर नाहकच अशासकीय कर्मचारी असलेले पोलीस पाटलांना जुंपल्याने त्यांच्यात असंतोष आहे.
जोखीम असल्याने येथे शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. यासोबतच सध्या कडाक्याची थंडी पडत असल्याने महसूल विभागाने या पोलीस पाटलांना त्यापासून संरक्षण करण्यासाठी कुठलीही साधनसामुग्री पुरविली नाही. हे पोलीस पाटील टाकळी परिसरात असलेल्या वनविभागाच्या वनउपज तपासणी नाक्यात शेकोटी पेटवून तिच्यासमोर बसून रात्र जागून काढत रेती तस्करांवर पाळत ठेवत आहेत. अशा स्थितीत अधिकारी मात्र बंगल्यावर निद्रीस्त होण्यात धन्यता मानत आहेत.
जमनी परिसरात असलेल्या रेती साठ्यांवर पाळतीची जबाबदारी असली तरी तिथे त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे पोलीस पाटील तिथे थांबण्याचा धोका पत्करत नाही. तुटपुंज्या मानधनावर गृह विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस पाटलांकडे महसूल विभागाने जबाबदारी सोपविल्याने त्यांच्या मानधनात वाढ करावी अशीही मागणी आता त्यांच्याकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)