अधिकारी पोहोचले बांधावर
By Admin | Updated: October 27, 2015 00:40 IST2015-10-27T00:40:00+5:302015-10-27T00:40:00+5:30
गोबरवाही परिसरातील राजापूर येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धानपिकाची बांधावर जाऊन पाहणी केली.

अधिकारी पोहोचले बांधावर
धानपिकांची पाहणी : राजापूर दुष्काळग्रस्त करण्याची मागणी
तुमसर : गोबरवाही परिसरातील राजापूर येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धानपिकाची बांधावर जाऊन पाहणी केली. पाऊस असमाधानकारक झाल्याने परिसर दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सिंचनाची सोय नाही, पाऊस असमाधानकारक पडला. धान पिकाने माना खाली घातल्या. धानपीक पिवळे, काळे पडले, पिकावर संक्रमण अळींनी हल्ला केला. शेतातील पीक गेले, शेतकरी हवालदिल व सिंचाग्रस्त पडला. राजापूरच्या सरपंच रिनू मासूलकर, उपसरपंच वसंत बिटलाये यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून राजापूर गाव दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती.
निवेदनाची दखल घेवून महसूल विभागाने राजापूर येथे पथक पाठवून बांधावर जाऊन धानाची पाहणी केली. चौकशी पथकाने शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. धानपीक नष्ट होण्याची कारणे जाणून घेतली. शासनाला धानपिकाची सविस्तर माहिती देण्यात येईल, असे पथकाने सांगितले. यावेळी सरपंच रिनू मासूलकर, उपसरपंच वसंत बिटलाये, पोलीस पाटील दिवाकर डोंगरे, सलाम, भक्तराज राऊत, करमकर, सतेज नेवारे, सुदाम झोडे, जगन्नाथ परबते, ग्रामसेवक, तलाठी कदमसह राजापूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)