अधिकाऱ्याने भंगार साहित्य परत मागविले

By Admin | Updated: July 24, 2016 00:32 IST2016-07-24T00:32:47+5:302016-07-24T00:32:47+5:30

अंगणवाडीत लोखंडी कपाट व खुर्ची खरेदीसाठी थेट आंगणवाडी सेविकेच्या खात्यात निधी जमा करण्यात आली.

The officer called back the scrap material | अधिकाऱ्याने भंगार साहित्य परत मागविले

अधिकाऱ्याने भंगार साहित्य परत मागविले

अफरातफर: प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने अधिकाऱ्याची सारवासारव
तुमसर : अंगणवाडीत लोखंडी कपाट व खुर्ची खरेदीसाठी थेट आंगणवाडी सेविकेच्या खात्यात निधी जमा करण्यात आली. परंतु अधिकाऱ्याने दडपशाहीचा वापर करून सेविकेच्या खात्यातले पैसे काढून त्याऐवजी भंगार साहित्य पुरवठा केल्याचे उघडकीस आले. भंगार साहित्य अधिकाऱ्याने परत मागविल्याने गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे सदर प्रकरण अधिकाऱ्याच्या अंगलट येणार हे आता निश्चित झाले आहे.
तुमसर तालुक्यातील १६५ अंगणवाडी केंद्राकरिता लोखंडी कपाट व खुर्ची खरेदीसाठी ५ हजार रुपये प्रमाणे ८ लाख २५ हजार रुपयाचा निधी हा थेट अंगणवाडी सेविकेच्या खात्यात जमा करण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांनी दबाव तंत्राचा वापर करून तुमसर येथील सीडीपीओ तथा प्रभारी खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर व पर्यवेक्षिका डायरे यांनी आंगणवाडी सेविकांना धमकावून त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे काढण्यास भाग पाडले. अशी लेखी तक्रार अंगणवाडी सेविकेची आहे.
ते १६५ अंगणवाडीचे पैसे काढून या अधिकाऱ्यांनी एका कंत्राटदाराला हाताशी घेवून भंगार लोखंडी कपाट खरेदी करून प्रत्येक अंगणवाडीत ते पोहचते केले. ज्यावेळी ते कपाट उघडले असता कपाटाचे दारच अंगणवाडी सेविकेच्या हातात आले. तर कुठे कपाटाला चादरच लावलेली नव्हती.
ते कपाट तर भंगारातही विकत काढले तर १०० रुपयांच्या वर कुणी पैसे द्यायला तयार होणार नाही अशीच स्थिती बऱ्याचशा अंगणवाडी व प्रत्यक्ष पाहणी दरम्यान महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी राहांगडाले यांच्या निदर्शनात आल्याने प्रकरणाची खातरजमा केले. ते प्रकरण जिल्हा परिषदच्या स्थायी समितीसमोर मांडून गैरव्यवहाराचे प्रकरण चव्हाट्यावर आणले. परिणामी प्रकरणाची सावरासावर करण्याकरिता सीडीपीओ हिरुडकर यांनी अंगणवाडीत पाठविलेला भंगार लोखंडी कपाट परत मागवून घेतले.
गैरव्यवहारावर अधिकाऱ्यांनीच शिक्कामोर्तब केल्याने सदर प्रकरण त्यांच्या अंगलट येणार असल्याचे बोलले जात असून अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The officer called back the scrap material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.