कार्यालय एक; अधिकारी दोन
By Admin | Updated: February 21, 2015 00:48 IST2015-02-21T00:48:42+5:302015-02-21T00:48:42+5:30
जिल्ह्यात विविध कार्यालयांतर्गत अनेक पदे रिक्त असताना जिल्हा परिषदेच्या

कार्यालय एक; अधिकारी दोन
लेखा परीक्षण कार्यालयातील प्रकार : अनेक प्रकरणे थंडबस्त्यात
भंडारा : जिल्ह्यात विविध कार्यालयांतर्गत अनेक पदे रिक्त असताना जिल्हा परिषदेच्या लेखा परिक्षण कार्यालयात एकाच पदावर दोन अधिकारी अधिनस्थ असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. एकाच खुर्चीसाठी दोन अधिकाऱ्यांच्या दावेदारीमुळे खाजगी शिक्षकांची कार्यालयीन प्रकरणे रखडली आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल शिक्षकांना पडला आहे. याची शिक्षण उपसंचालकांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
माहितीनुसार, येथील साई मंदिर मार्गावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातंर्गत लेखा परिक्षण कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकांची वरिष्ठ निवड श्रेणी प्रकरणे, पदोन्नती, सेवा सातत्य प्रकरणे, वेतन निश्चिती प्रकरणे आदी कार्य केली जातात. लेखाधिकारी कार्यालयातून वेतन निश्चिती पडताळणी झाल्याशिवाय शिक्षकांना वेतनाचा लाभ मिळत नाही. पंरतु यासाठी स्वाक्षरी करणारे दोन अधिकारी असल्याने आणि खुर्चीसाठी भांडणे सुरू असल्याने याचा फटका सरळसरळ शिक्षकांना बसत आहे.
तत्कालिन लेखाधिकारी ऐ.जे. धाडसे यांची ३१ मे २०१४ रोजी नागपूर येथे प्रशासकीय बदली करण्यात आली. ३० जुलै २०१४ रोजी त्यांना कार्यमुक्त करण्याचे डीडीचे आदेश मिळाले. त्यांच्या जागेवर प्र.ल. आकुनवार यांची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान धाडसे हे ३१ जुलै २०१५ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनी भंडारा येथे बदली करण्याची विनंती केली. त्यांची मागणी फेटाळण्यात आली. धाडसे यांनी सदर प्रकरम महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपुर येथे दाखल केले.
३१ आॅक्टोबर २०१४ रोजी आदेशानुसार त्यांची बदली रद्द करण्यात आली. परंतु त्यांना भंडारा येथे रूजु करून घेण्यात आले नाही. न्यायाधिकारणाच्या आदेश अवमान प्रकरणी त्यांनी पुन्हा अपील केली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी १२ फेब्रुवारी २०१५ ला तत्काळ पूर्ववत पदावर रूजु होण्यासंदर्भात धाडसे यांना आदेश दिले. त्यानुसार धाडसे हे रूजू झाले असले तरी प्र.ल. आकुनवार यांच्या अधिनस्थ असलेले दस्तऐवज हे कपाटात कुलूपबंद असल्याने शिक्षकांची कामे रखडली आहेत. आकुनवार यांनी पदभार न सोडल्यामुळे किंवा धाडसे यांना चार्ज न दिल्याने खुर्चीवर बसलेले साहेब आहेत की भरारी पथकात (दौऱ्यावर) असलेले साहेब आहेत, हे शिक्षकांना कळायला मार्ग नाही. त्यामुळे संभ्रमाची स्थिती कायम असल्याने कार्यालय एक; अधिकारी दोन अशी म्हणण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात आकुनवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
उपसंचालकांनी दखल घ्यावी
४एकाच पदावर दोन अधिकारी दावेदारी सांगत असल्याने खाजगी शाळांमधील शिक्षकांची प्रकरणे रखडली आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी दखल घेऊन खुर्चीचा वाद संपवावा व प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक संघ भंडाराने केली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर मी कार्यालयात रूजू झालो आहे. कागदपत्रे कपाटात कुलुपबंद असल्याने टेबलवरील प्रकरणे मार्गी लागतील. कुलुपबंद फायलींच्या प्रकरणात मी काहीही करू शकणार नाही.
- आनंद धाडसे,
लेखाधिकारी.