निविदा स्वीकारण्याच्या दिवशी कार्यालय बंद
By Admin | Updated: October 18, 2015 00:18 IST2015-10-18T00:18:10+5:302015-10-18T00:18:10+5:30
ग्राम पंचायत स्तरावर होणाऱ्या कामात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी शासनाने ई-निविदा प्रक्रिया सुरु केली. पण प्रत्येक कामात वरच्या कमाईत...

निविदा स्वीकारण्याच्या दिवशी कार्यालय बंद
वरठी : ग्राम पंचायत स्तरावर होणाऱ्या कामात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी शासनाने ई-निविदा प्रक्रिया सुरु केली. पण प्रत्येक कामात वरच्या कमाईत पटाईत कर्मचाऱ्यानी यातही भ्रष्टाचार करण्याची शक्कल शोधुन काढली. ई- निविदेची हार्ड कॉपी स्विकारण्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात आले. कर्मचाऱ्याला निविदा स्विकारू नये, असे आदेश देवून हेतुपुरस्सर निविदा फेटाळण्यात आली. याबाबद निविदाधारक महावीर ट्रेडिंग कंपनीने खंड विकास अधिकाऱ्याकडे दाद मागीतली आहे. सदर प्रकरण तालुक्यातील कुशारी ग्रामपंचायत येथे घडले.
तालुक्यातील कुशारी ग्राम पंचायतला सर्व योजनांच्या अंतर्गत विविध बाधंकाम कामाकरीता साहित्य पुरवण्याबाबद ई- निविदा काढण्यात आली. ई -निविदानुसार इच्छुक निविदा पुरवठा धारकास ३ आॅक्टोंबर पासून १२ आॅक्टोंबर दुपारी ३ वाजतापर्यत कोऱ्या निविदा डाऊनलोड करायच्या होत्या. आॅनलाईन निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर १२ आक्टोंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यत ई निविदेची हार्ड कॉपी ग्राम पंचायत कार्यालयात जमा करायची होती. यासोबत नापरतावा एक हजार रुपयांचा डिमांड ड्राप द्यावयाची होती.
ई निविदेनुसार वरठी येथील महाविर ट्रेडींग कंपनीने सर्व कागदपत्रांची पुर्तता करून ई निविदा आॅनलाईन सादर केले. वेळापत्रकात ठरवून दिल्याप्रमाणे १२ आक्टोंबर ला हार्ड कॉपी ग्रामपंचायत कुशारी येथे पाठवण्यात आले. पण कार्यालय बंद होते. प्रतीक्षा करूनही कार्यालय न उघडल्यामुळे निविदाधारकाने गावात चौकशी करून सरपंच व शिपायाांचे घर गाठले व निविदा घेण्यास सांगितले. पण ग्राम सेवकाने निविदा स्विकारण्यास मज्जाव केल्याचे शिपायाने सांगितले. या सदर्भात चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी तक्रारीच्या माध्यमातून केली आहे. (वार्ताहर)