बुद्धांच्या अस्थिदर्शनाला उसळली गर्दी
By Admin | Updated: October 18, 2015 00:15 IST2015-10-18T00:15:53+5:302015-10-18T00:15:53+5:30
संपूर्ण विश्वाला शांती अहिंसेची शिकवण देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र सोनेरी अस्थिधातू कलशाचे वैशाली नगर सदधम्म बुद्ध विहारात...

बुद्धांच्या अस्थिदर्शनाला उसळली गर्दी
स्वागतासाठी रांगा : वैशालीनगर विहारात कलशाचे प्रथम आगमन
भंडारा : संपूर्ण विश्वाला शांती अहिंसेची शिकवण देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र सोनेरी अस्थिधातू कलशाचे वैशाली नगर सदधम्म बुद्ध विहारात प्रथम आगमन होताच हजारो उपासक उपासिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन वंदन करीत हर्षाेउल्हासात स्वागत केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतात साजरी होत असलेल्या १२५ व्या जयंती दिनाच्या पर्वावर व नागपूर येथे विजयादशमी दिनी संपन्न झालेल्या ६० व्या धम्मचक्र प्रवर्तनानिमित्त श्रीलंका सरकार द्वारा बुद्धांच्या अस्थिधातुचे भारतात नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले होते. याची चाहूल लागताच सदधम्म बुद्ध विहाराच्या आयोजकांनी व वैशाली नगर वासियांनी या संधीचे सोने केले. भंडाऱ्यातील वैशाली नगर बुद्ध विहारात अस्थिकलश आणून हजारो बांधवांना दर्शनार्थ उपलब्ध करून दिला.
भंडाऱ्यात आगमन होताच येथील त्रिमुर्ती चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या अस्थिधम्मरथाचे मोटारसायकल रॅलीने भगवान बुद्धांचा जयजयकार करीत वैशाली नगर गेटवर आगमन झाले. येथे विहार समितीचे महादेव मेश्राम, म.वा. दहिवले, वामन मेश्राम, अॅड. डी.के. वानखेडे, प्रा. रमेश जांगळे, प्रा. रवी वाहाने, पी.डी. मेश्राम आदींनी पवित्र अस्थिधातु कलशाचे स्वागत केले. लगेच गेटपासून विहारापर्यंत शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या उपासिकांनी रांगेत अस्थिकलशावर पुष्पवृष्टी केली. अशाप्रकारे धम्मरथ व त्यावरील पवित्र अस्थिधातुकलशाचे विहारात आगमन झाले.
विहारातील सदधम्म मंचावर श्रीलंकेचे भंते वास्तडोये महिंदावत्स महानायके, भंते ओकांदे आनंदथेरो भदंत लोगवाक, भंते डांगामेह ट्युएन व्हीएतनाम, बंधुला विरादर्शने श्रीलंका, भारतीय बौद्धमहासभा विदर्भ प्रदेशचे सचिव अनिल मेश्राम, बुद्धा स्पिरीच्युअल पार्क सिहोरा (कन्हान)चे संयोजक नितीन गजभिये आदी उपस्थित होते.
सकाळपासून बौद्ध विहार व समोरील प्रांगणात हजारोच्या संख्येने जनसमुदाय एकत्रित झाला होता. श्रीलंकेचे भंते वास्तडोये महिंदावत्स महानायक यांनी विहारातील भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बुद्धविहार व परिसरातील हजारो जनसमुदयास त्रिशरण व पंचशील देऊन सर्वांच्या कल्याणाचे मंगलकामना केली. ते म्हणाले, भगवंताच्या पवित्र अस्थिधातुचा कलश हा केवळ विहारात अथवा त्यालगत परिसरात ठेवण्याची पुर्वपरंपरा आहे. येथील जनतेने हा कलश सदधम्म बौद्ध विहार वैशाली नगर भंडारा येथे आणून पवित्र कार्य केले आहे. असेच धम्म कार्य करीत राहा, असा उपदेश दिला.
याप्रसंगी वैशाली नगर म्हाडा कॉलनी, तुलसी नगर, फ्रेन्डस कॉलनी व गावखेड्यातून आलेल्या सुमारे चार हजार जनतेने दर्शन घेतले. यावेळी कुशीनारा येथे बुद्धाच्या परिनिर्वाणाचे विविध कटआउटस, शुभ्र वस्त्र परिधान केलेले बौद्ध बांधव, रांगेत उभे राहून शांततेत अस्थिधातुचे दर्शन हे विशेष आकर्षण होते. कार्यक्रमाकरीता विहार अध्यक्ष महादेव मेश्राम, सचिव म.वा. दहिवले, वामन मेश्राम, अॅड. डी.के. वानखेडे, प्रा. रमेश जांगळे, प्रा. रवी वाहाने, प्रा. पी.डी. मेश्राम, सुरेंद्र सुखदेवे, चंद्रमणी मेश्राम, रविंद्र ढोके, पी.के. ठवरे, हरीदास चंद्रिकापुरे, प्रमोद बोरकर, विनोद चवरे, हरीचंद्र रामटेके, बंटी हुमने, शंकर बोरकर, सलीम पठाण, सतीश मेश्राम तसेच भद्रा कात्यायन महिला मंडळाच्या शकुंतला हुमने, कल्पना ढोके, विशाखा वाहाने, सुशिला खोब्रागडे, कविता सरादे, मिनाक्षी वाहाने, जोत्सना जांगळे, शकुंतला गजभिये, आदिंनी सहकार्य केले. प्रास्ताविक म.वा. दहिवले संचालन प्रा. रमेश जांगळे प्रा. रवी वाहाने यांनी आभार मानले. (नगर प्रतिनिधी)