ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करा
By Admin | Updated: August 6, 2016 00:26 IST2016-08-06T00:26:06+5:302016-08-06T00:26:06+5:30
ओबीसी प्रवर्गावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील सर्व नेते एकत्र आले आहेत.

ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करा
सेवक वाघाये : नागपुरात ओबीसींचे महाअधिवेशन
भंडारा : ओबीसी प्रवर्गावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील सर्व नेते एकत्र आले आहेत. त्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने ओबीसींचे महाअधिवेशन ७ आॅगस्ट रोजी नागपुरात होत आहे. या महाअधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष माजी आमदार सेवक वाघाये यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, बांधकाम सभापती विनायक बुरडे, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, प्यारेलाल वाघमारे हे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करा, केंद्र व राज्य सरकारकडे थकीत असलेली ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने देण्यात यावी, उच्च शिक्षणातील ओबीसी विद्यार्थी विद्यार्थीनीना शिष्यवृत्ती द्यावे, केंद्र व राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये, शैक्षणिक प्रवेशामध्ये असलेले २७ टक्के आरक्षण पूर्ण भरण्यात यावे, अनुशेष भरुन काढा,
केवळ शासन निर्णय काढू नका, प्रत्यक्षात शासन निर्णयाप्रमाणे कृती करा, काँग्रेस सरकारने दिलेली व भाजप सरकारने रद्द केलेली तीन लाख रूपयांची राजीव गांधी फेलोशिप पूर्ववत सुरु करा, क्रिमीलेअरची मर्यादा ठरविताना होणारा अन्याय दूर करा, मर्यादा १० लाख रुपये करा, जातपडताळणी करिता ओबीसी संवर्गातीलच अधिकाऱ्यांची नेमणूक करा, ओबीसीमध्ये एससी, एसटी, एनटी अल्पसंख्याक याबद्दलचे संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे शासकीय प्रयत्न ताबडतोब बंद करा, केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीमध्ये विभागीय पदोन्नतीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करावे, अशा मागण्या असल्याचे वाघाये यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)