३,५८४ हेक्टरमध्ये रोपवाटिका

By Admin | Updated: June 28, 2015 00:50 IST2015-06-28T00:50:48+5:302015-06-28T00:50:48+5:30

जिल्ह्यात एकूण १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धानाच्या रोपवाटिकेसाठी नियोजित आहे.

Nursery in 3,584 hectares | ३,५८४ हेक्टरमध्ये रोपवाटिका

३,५८४ हेक्टरमध्ये रोपवाटिका

तिरोडा तालुक्यात अत्यल्प : १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेचे उद्दिष्ट
गोंदिया : जिल्ह्यात एकूण १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धानाच्या रोपवाटिकेसाठी नियोजित आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी रोपवाटिका घालण्यात आली नाही. तिरोडा तालुक्यात केवळ ५५ हेक्टरमध्येच रोपवाटिका घालण्यात आली असून जिल्ह्यात एकूण तीन हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका २३ जूनपर्यंत घालण्यात आल्याची नोंद जिल्हा कृषी विभागाने घेतली आहे.
यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ९०० हेक्टरमध्ये भातपिकांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेची गरज असताना प्रमाणशीर पावसाच्या अभावाने आतापर्यंत केवळे तीन हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका लावण्यात आली आहे. त्यातच तिरोडा व सालेकसा तालुक्यात कमी प्रमाणात रोपवाटिका लावण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंतासुद्धा वाढतच आहे.
काही ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे ड्रील पॅडी मशीनचा उपयोग करून बियाणे पेरली जातात. ही मशीन ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला लावली जाते. तसेच ट्रॅक्टरच्या मागे ट्रॉन्सप्लान्टर मशीन लावून पऱ्हेसुद्धा लावली जातात. मात्र त्यासाठी रोपांना प्लास्टिक पॉलिथिनमध्ये तयार करावी लागतात. मग त्यांना ट्रॉन्सप्लांटर मशीनमध्ये ठेवून ट्रॅक्टरच्या सहाय्याने पऱ्हे लावले जातात. त्यामुळे मजुरांची फारशी गरज पडत नाही व मजुरीसुद्धा वाचते.
यावर्षी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याची आशा आहे. मात्र कधी पाऊस कधी उन्ह तर कधी संततधार यामुळे त्यांच्या आशा पूर्ण होणार किंवा नाही, याची चिंता सतावत आहे.
याशिवाय काही ठिकाणी आवत्यांद्वारे बियाण्यांची पेरणी केली जाते. शेतजमीन पडीत ठेवण्यापेक्षा आवत्यांद्वारे पेरणी केल्याने मजुरी वाचते, मात्र २० टक्के उत्पन्न कमी होते. परंतु श्री पद्धतीने पेरणी केल्यास उत्पन्न दीड ते दोन पटीने वाढते, असे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

आवत्या पद्धतीमध्ये पेंडीमिथीलिन (स्टॉम्प) किंवा ब्युटाक्लोर किंवा पायरोझोसल्पोरान पेरणी आधी व पेरणीनंतर जमिनीवर घालावी लागते. ही औषध रेतीमध्ये मिसळून शेतजमिनीवर फेकावी लागते. तसेच रोवणीनंतर चार ते पाच दिवसांनी तण निघण्यापूर्वी असे केल्यास तणांचा त्रास होणार नाही. औषधाचे प्रमाण दोन किलो प्रति एकर असावे. आवत्या पद्धतीमध्ये २० टक्के कमी उत्पन्न होते. मात्र श्री पद्धतीचा वापर केल्यास उत्पन्न दीड ते दोन पटींनी वाढते.
-ए.एस. भोंगाडे,
तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी कार्यालय, गोंदिया

Web Title: Nursery in 3,584 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.