आता एकाचवेळी होणार अद्ययावत सेवापुस्तिका
By Admin | Updated: November 23, 2014 23:13 IST2014-11-23T23:13:24+5:302014-11-23T23:13:24+5:30
शिक्षकांच्या वेळेची बचत व्हावी, याशिवाय कामात पारदर्शकता यावी, यासाठी मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षकांच्या सेवापुस्तिका शिबिर घेऊन अद्ययावत करण्यात येणार

आता एकाचवेळी होणार अद्ययावत सेवापुस्तिका
शिक्षण विभागाचा उपक्रम : गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांची माहिती
ंमोहाडी : शिक्षकांच्या वेळेची बचत व्हावी, याशिवाय कामात पारदर्शकता यावी, यासाठी मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षकांच्या सेवापुस्तिका शिबिर घेऊन अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
शिक्षकांच्या सेवा पुस्तिका अद्ययावत करून घेण्याचा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षक विभागाकडून होत आहे. मोहाडी पंचायत समितीमधील शिक्षण विभागाअंतर्गत आठ केंद्र आहेत. या आठही केंद्रात मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, सहायक शिक्षक व केंद्रप्रमुख असे ४२२ जणांचा समावेश आहे. केंद्रस्तरावर शिक्षकांचे मुळ सेवापुस्तिका अद्ययावत करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी राठोड यांनी १८ नोव्हेंबरला आदेश काढले आहेत.
कांद्री केंद्रातील शिक्षकांसाठी २६ नोव्हेंबर, आंधळगाव २ डिसेंबर, जांब-पिंडकेपार, नेरी-९ डिसेंबर, पालोरा १२ डिसेंबर, करडी १६, मोहगावदेवी १९, हरदोली २३ डिसेंबर रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. या शिबिराला मुख्याध्यापक व शिक्षकांनी गैरहजर न राहण्याचे कळविण्यात आले आहे. या शिबिरासाठी अधीक्षक एच.एच. चौधरी, के.एस. खंडाते, ए.एम. कहालकर, एल.बी. तिरपुडे, हिना कुरेशी यांची कार्यालयीन चमू तयार करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाला शिक्षक मनापासून प्रतिसाद देतील, अशी आशा गटशिक्षणाधिकारी राठोड यांनी व्यक्त केली.
या शिबिरामुळे पंचायत समितीला वारंवार भेट देण्याचा मनस्ताप थांबणार आहे. याशिवाय या कामासाठी देवाणघेवाणीचा प्रकारही थांबणार आहे.
एकाचवेळी सगळ्या शिक्षकांची कामे होणार असल्यामुळे शिक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. या कामासाठी दिलेल्या शिबिराच्या तारखांना सकाळपाळीत शाळा राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)