आता शाळांना मिळणार मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 00:40 IST2016-08-29T00:13:22+5:302016-08-29T00:40:30+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी बदल घडविल्या जात असताना आता शाळांचे 'रँकींग' करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

आता शाळांना मिळणार मानांकन
'लूक' बदलणार : जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धा
भंडारा : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी बदल घडविल्या जात असताना आता शाळांचे 'रँकींग' करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.यामध्ये रंगाद्वारे शाळांना 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' व रँक दिल्या जाणार आहे. त्यामध्ये अव्वल रँकींगसाठी शाळांमध्ये निकोप स्पर्धा राहणार आहे.
शाळा स्वच्छ, समृद्ध व आनंददायी व आरोग्यदायी असेल तरच ज्ञानाची आदानप्रदान प्रक्रिया प्रभावी आणि परिणामकारक होत असते. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापर्यत तीन समित्या राहणार आहे. तालुकास्तरावरील समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी व अन्य सदस्य जिल्हास्तरावरील समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य सदस्य व राज्य समितीमध्ये प्रधान सचिव व अन्य सदस्य राहणार आहे. या समित्यांतर्फे शाळांचे परिक्षण व गुणांकन होणार आहे.पुरस्कारासाठी पाच क्षेत्र व ३९ घटक निश्चित केले आहेत. त्यामध्ये पाण्याची उपलब्धता २२ गुण, शौचालयाची व्यवस्था २८ गुण, हात धुण्याची व्यवस्था २० गुण, देखभाल व्यवस्था १५ गुण, वर्तवणूक बदल व क्षमता व विकास १५ गुण याप्रमाणे गुणांकन राहणार आहे.
ज्या शाळांचा प्रारंभ रेटिंग किमान पिवळा असेल अशा शाळांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ग्रामीण विभागात तीन प्राथमिक शाळा, तीन माध्यमिक शाळा तसेच प्रत्येक क्षेत्रातील ग्रीन मार्कींग शाळा अशा ३० शाळा पुरस्कारासाठी पात्र असतील. शहरी विभागातील एक प्राथमिक व एक माध्यमिक शाळा तसे प्रत्येक उपक्षेत्रातील ग्रीन स्टार प्राप्त हक प्राथमिक शाळा अशा १० शाळा पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या शाळांचा निळा रंग राहणार आहे.या शाळा राज्यस्तरावरील स्पधेर्साठी पात्र ठरणार आहेत. यामध्ये एकूण २० शाळांचा समावेश राहणार आहे. यापैकी १५ ग्रामीण व ५ शहरी शाळांची निवड करण्यात येणार आहे.या स्पर्धेमुळे शाळांचे बाह्यरंग व अंतरंग बदलण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेविषयीचे आकर्षण वाढण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)
मानांकनाच्या आधारे असेल शाळांचा रंग
गुणांकनाच्या आधारावर ९० ते १०० गुण प्राप्त शाळांना हिरवा रंग, ७५ ते ८९ प्राप्त गुण शाळांना निळा रंग, ५१ ते ७४ गुणांच्या शाळांना पिवळा रंग, ३५ ते ५० गुणांच्या शाळांना नारंगी रंग व ३५ पेक्षा कमी गुण असणाऱ्या शाळांना लाल रंग असे मानांकन राहणार आहे.जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होणार आहे.ज्यांचा रंग पिवळा राहणार आहे त्या शाळांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.यात ग्रामीण विभागातील तीन प्राथमिक शाळा व तीन माध्यमिक शाळा तसेच ग्रीन रँकिंग शाळा अशा एकूण ३० शाळा पुरस्कारासाठी पात्र राहतील.