आता शाळा केवळ तीन तास
By Admin | Updated: April 28, 2016 00:31 IST2016-04-28T00:31:49+5:302016-04-28T00:31:49+5:30
शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळयातील वाढणारे तापमान, पाणी टंचाई या बाबी लक्षात घेता शाळा सकाळपाळीत ७ ते १० पर्यंत ठेवण्यात यावी ...

आता शाळा केवळ तीन तास
७ ते १० शाळा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
भंडारा : शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळयातील वाढणारे तापमान, पाणी टंचाई या बाबी लक्षात घेता शाळा सकाळपाळीत ७ ते १० पर्यंत ठेवण्यात यावी व सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण सुटी द्यावी. तसेच शिक्षकांनी सकाळी ११ वाजेपर्यंत शाळेत उपस्थित राहावे. ११ नंतर एकही शिक्षक शाळेत उपस्थित राहणार नाही व शाळा बंद राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी अनुदानित, खाजगी विना अनुदानित, कायम विना अनुदानित, सी.बी.एस.ई, प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना १५ मार्चपासून शाळा सकाळपाळीत सुरू ठेवण्यात आलेल्या होत्या. शाळेची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी १२ पर्यंत ठेवण्यात आलेली होती. शिक्षक संघटनांनी केलेल्या निवेदनानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळयातील वाढणारे तापमान, पाणी टंचाई इत्यादी बाबी लक्षात घेता शाळा सकाळपाळीत ७ ते १० पर्यंत ठेवण्यात यावी व सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण सुटी द्यावी. शिक्षकांनी सकाळी ११ वाजेपर्यंत शाळेत उपस्थित रहावे. ११ वाजेनंतर एकही विद्यार्थी व शिक्षक शाळेत उपस्थित राहणार नाही व शाळा बंद राहील. शाळेच्या स्कुल बसेस सावलीत ठेवण्यात यावे व बसेसमध्ये थंड पाण्याची सोय व ओ.आर.एसचे पॉकेटस ठेवण्यात यावे, विद्यार्थ्यांचे उन्हापासून संरक्षण होईल, याची काळजी घ्यावी. याकरीता मुख्याधापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)