आता धान्य पोहोचविण्याची जबाबदारी एकाच कंत्राटदारावर!
By Admin | Updated: October 27, 2015 00:38 IST2015-10-27T00:38:02+5:302015-10-27T00:38:02+5:30
आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सुधारीत सार्वजनिक वितरण प्रणाली अंमलात आणली आहे.

आता धान्य पोहोचविण्याची जबाबदारी एकाच कंत्राटदारावर!
विक्रेत्यांना दिलासा : १ नोव्हेंबरपासून सुधारित वितरण प्रणाली
भंडारा : आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सुधारीत सार्वजनिक वितरण प्रणाली अंमलात आणली आहे. त्यानुसार धान्य पुरवठा आता थेट स्वस्त धान्य दुकानात पोहोचविण्यात येणार आहे. त्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा विभागाने पुढाकारानंतर भंडारा जिल्ह्यात ही सुधारीत धान्य वितरण प्रणाली १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी नियुक्त कंत्राटदार भारतीय अन्न महामंडळातून धान्य उचलेल. ते धान्य शासकीय गोदामात जमा करेल. त्यानंतर ते धान्य प्रत्येक दुकानदारांना पोहोचवून देण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.
या धान्य पुरवठा योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना काय मिळणार आहे, याबाबत काही सांगण्यात आले नसले तरी राशन दुकानदारांना गोदामातून आपल्या दुकानापर्यंत धान्य आणण्यासाठी होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
धान्य कमी येण्याची शक्यता दुकानापर्यंत थेट धान्य पोहोचविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु यात अनेक त्रुट्या आहेत. यापूर्वी गोदामातून धान्य नेताना ते वजन करुन नेत होते. आता कंत्राटदार धान्य पोहोचविल्यानंतर त्याचे वजन होणार नाही. त्यामुळे पोत्यात धान्य कमी येण्याची शक्यता आहे. पोत्यात धान्य कमी आले तर त्याचा अकारण भुर्दंड दुकानदाराला बसणार आहे. याशिवाय प्रति क्विंटल ११ रुपयांची सुट दुकानदाराऐवजी कंत्राटदाराला मिळेल. त्यामुळे सरकारने धान्य दुकानदारांना कमिशन वाढवून देण्याची गरज आहे.
- अरविंद कारेमोरे,
जिल्हाध्यक्ष, धान्य विक्रेता संघ.