आता रोहयो मजुरांकरिता ‘प्रोजेक्ट लाईफ’
By Admin | Updated: June 28, 2015 00:53 IST2015-06-28T00:53:54+5:302015-06-28T00:53:54+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची कौशल्य वृद्धी व्हावी, ....

आता रोहयो मजुरांकरिता ‘प्रोजेक्ट लाईफ’
मजुरांना मिळणार संधी : शासनाचा उपक्रम, सर्वेक्षणाला सुरूवात
तुमसर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची कौशल्य वृद्धी व्हावी, स्वत:चा व्यवसाय करून स्वयंपुर्णता स्वत:ची उपजिविका चालविण्याकरिता सक्षम व्हावे, याकरिता केंद्र शासनाने प्रोजेक्ट लाईफ मनरेगा हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या कुटूंबानी मग्रारोहयो योजनेवर १०० दिवस काम केले अशा कुटूंबातील एका व्यक्तीला प्रोजेक्ट लाईफमध्ये संधी मिळणार आहे. त्यांच्यातील कौशल्य वृद्धीसाठी त्यांना प्रशिक्षण दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना तसेच आरएसईटीआय योजनेच्या माध्यमातून देण्यात येत असल्याने तुमसर तालुक्यातही १०० दिवस काम करणाऱ्या मजुरांच्या सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे.
प्रोजेक्ट लाईफ म्हणजे स्वयंपुर्ण रोजगार करून जिवित निर्वाह करणे होय. प्रोजेक्ट लाईफ मनरेगा ही केंद्र शासनाची योजना आहे. लाईफ प्रोजेक्टच्या अंमलबजावणीकरिता शासनाने २२ जुनला परिपत्रक काढून मग्रारोहयो योजनेवर १०० दिवस काम करणाऱ्या कुटूबातील पुरूष सदस्य हा जर १८ ते ३५ या वयोगटातील असेल किंवा महिला १८ ते ४५ वयोगटातील असतील, अशा कुटूंबातील एका सदस्याला कुशल मजुरीसाठी, स्वयंरोजगारासाठी कौशल्यवृद्धी किंवा मग त्यांच्याकडे अस्तित्वात असलेल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी पं. दिनदयाल उपाध्यक्ष ग्रामीण कौशल्य योजना, आरएसईटीआय तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियाना अंतर्गत प्रशिक्षण देवून मजुरांना स्वयंपुर्ण बनवून त्यांचा जीवनमान उंचावण्याकरिता प्रयत्न या लाईफ प्रोजेक्ट मधून करणार आहेत.
प्रोजेक्ट लाईफमध्ये मजुरांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जसे कृषी संबंधित उद्योग प्रशिक्षणात दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, रबर टॅपिंग, रेशिम उद्योग, लाख लागवड मेंढी पालन, मधुमक्षीपालन, बायोगॅस प्रकल्प इत्यादी तर व्यवसाय निगडित उद्योग प्रशिक्षणामध्ये वाहन दुरूस्ती व देखभाल, कम्प्युटर हार्डवेअर, फोर्क लिप्ट, आॅपरेशन घरगुती रूग्णसेवा होमनर्सिंग हॉटेल मॅनेजमेंट आदी वेल्डींग, टी.व्ही. व एसी दुरूस्ती, सुरक्षा रक्षक, ब्युटी पार्लर, हातमाग, विविध उत्पादकांचे मार्केटिंग, फोटो डिझायनिंग आणि फेमिंंग, इत्यादीचे प्रशिक्षण मजुरांना सहजरित्या शिकणे शक्य होवून जास्त मिळकत मिळवून मजुरवर्ग स्वयंपुर्णतेने आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यात सक्षम बनेल.
त्या दुष्टीकोनातूनच केंद्र शासनाने प्रोजेक्ट लाईफ मनरेगा ही योजना अंमलात आणली आहे. शासनाच्या मंजुरी नंतरचकार्याला सुरूवात होणार आहे.
दि.२५ जून ते १५ जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात योग्य रितीने सर्वेक्षण व्हावा याकरिता रोजगार सेवकाच्या माध्यमातून गावपातळीवरच मजुरांची निवड करून मजुरांची याद्या पाठविण्या संदर्भात आदेश निर्गमित करण्यात असून संपूर्ण सर्वेक्षणानंतर यादी केंद्र शासनाला मंजुरी करिता पाठविणार आणि केंद्र शासनाच्या मंजुरी नंतरच दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य, आरएसईटीआय तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोत्ती अभियानातर्फे प्रशिक्षणाच्या कार्याला सुरूवात होणार आहे.
- एम.ई. कोमलवार,
प्र. उपजिल्हा कार्यक्रम समन्व्यक.