आता २४ तासांत वीज जोडणी
By Admin | Updated: October 11, 2016 00:37 IST2016-10-11T00:37:10+5:302016-10-11T00:37:10+5:30
नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाईल अँपच्या सहाय्याने केवळ चोवीस तासात वीज जोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया...

आता २४ तासांत वीज जोडणी
महावितरणचा उपक्रम : ग्राहकांची ताटकळत राहण्यापासून मुक्ती
भंडारा : नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाईल अँपच्या सहाय्याने केवळ चोवीस तासात वीज जोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. सध्या यामध्ये राज्यभरातील महावितरणच्या ३६ मंडळांतर्गत ८८ विभागांच्या निवडक कार्यक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.
महावितरणने विकसित केलेल्या मोबाईल अँपद्वारे आता ग्राहक सेवेचा मापदंड निर्माण केला आहे. आतापर्यंत राज्यात जुलै २०१६ पासून म्हणजे अवघ्या दोन महिन्यात १,२२८ ग्राहकांना चोविस तासात वीज जोडणी देण्यात आली आहे. आता या योजनेला गती मिळत असून ग्राहकांकडूनही अधिक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महावितरणकडून सांगण्यात येत आहे.
ज्या भागात नवीन वीज जोडणीसाठी अतिरिक्त वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा भागातील तब्बल १५० पेक्षा अधिक उपविभागांच्या कार्यक्षेत्रात महावितरणकडून ग्राहकाला चोवीस तासांत नवीन वीज जोडणी उपलब्ध होणार आहे. याबाबत सबंधित परिमंडळ, मंडळ, विभाग व उपविभाग, शाखा कार्यालय यांची नावे महावितरणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरगुती आणि वाणिज्यक वर्गवारीच्या सिंगल किंवा थ्रीफेजच्या नवीन वीज जोडणीसाठी सबंधित ग्राहकाची थकबाकी नसल्यास व दिलेल्या कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास चोवीस तासांत संबंधित ग्राहकाला वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवीन जोडणीसाठी इंटरनेटद्वारा महावितरणच्या संकेतस्थळामार्फत आणि अँपच्या माध्यमातून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. वीज जोडणी देण्याची संपूर्णअंतर्गत प्रक्रिया महावितरणने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आॅनलाईन करणे अनिवार्य केले आहे.
तसेच नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया थेट वीज जोडणीच्या ठिकाणाहूनच करता यावी यासाठी स्वतंत्र मोबाईल अँपची निर्मिती केली आहे. त्यामुळे नवीन वीज जोडणीसाठी अर्जप्राप्त होताच त्याबाबत कार्यालयीन, तांत्रिक व अन्य माहितीची नोंद महावितरणच्या प्रणालीत आॅनलाईन करण्याची सोय अभियंता व कर्मचाऱ्यांना या अँपद्वारा आता शक्य झाले आहे.
ग्राहक आणि सबंधित कर्मचारी दोघांचेही काम अँपमुळे हलके झाले असून चोवीस तासात वीज जोडणी उपक्रमामध्ये अँप महत्वाची भूमिका बजावित आहे. या सुविधेमुळे ग्रामीण तथा शहरी भागातील नविन वीज जोडणीधारकांना दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)
नागरिकांचा वाचणार त्रास
पूर्वी वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महिनोंमहिने वीज वितरणच्या कार्यालयात ग्राहकाला येरझारा माराव्या लागत होत्या. आता मात्र हा त्रास वाचणार आहे. परंतु यामध्ये काही अटी टाकण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी वीजजोडणी देण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा तयार आहेत. अशा परिसरातील वीज जोडणीचा आॅनलाईन अर्ज असल्यास चोविस तासात वीजजोडणी देण्यात येते. विनाकारण ग्राहकांची अडवणूक होऊ नये, हा त्यामागील हेतू आहे. परंतु ज्या ठिकाणी वीज जोडणी देण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आहे, सर्विस लाईनच नाही, अशा ठिकाणी मात्र चोविस तासात वीज जोडणी देता येणे शक्य नसल्याने महावितरणने स्पष्ट केले आहे.