आता राज्यातील आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेची होणार चौकशी
By Admin | Updated: October 2, 2015 05:35 IST2015-10-02T05:35:28+5:302015-10-02T05:35:28+5:30
तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील घोळ झाल्याची दखल घेत राज्य शासनाने सन

आता राज्यातील आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेची होणार चौकशी
लाखांदूर : तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील घोळ झाल्याची दखल घेत राज्य शासनाने सन २०१५ मधील महाराष्ट्रातील आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर येथील व्यवसाय व मार्गदर्शन विभागाचे सहसंचालक कार्यालयात हे आदेश धडकल्यामुळे आता बोगस प्रवेश प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
लाखांदूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन २०१५ ला आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याने अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी तक्रार केली. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. एक महिन्यापासून समितीने अहवाल सादर न केल्यामुळे विद्यार्थ्यांनी चौकशी समितीवर संशय घेतला आहे. व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेऊन रोजगार उभारावा अशी इच्छा बाळगून लाखांदूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पाडली. सन २०१५ ला पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध होताच कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र घोषित करून जास्त गुणधारक विद्यार्थ्यांना यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियातील अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतही घोळ झाल्याची बाब उघडकीस आली.
यासंदर्भात सहसंचालक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली. पहिल्यांदाच व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतर संस्थेत मूळ कागदपत्रांची तपासणी करूनच संस्थेत प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती. आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची तपासणी दरम्यान मूळ कागदपत्रात तफावत आढळून आली. यात तब्बल ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बनावट कागदपत्राच्या आधारावर देण्यात आल्याचे दिसून आले.
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वेल्डर, फिटर, मोटर मेकॅनिक, ड्रेस मेकींग, टेलरिंग, कोपा अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. दि. ३ सप्टेंबरला सहसंचालकांनी चौकशी समिती गठीत करून संस्थेतील विद्यार्थ्यांचे कागदपत्र तपासण्यात आले. सदर प्रतिनिधीने प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सात दिवसानंतर अहवाल प्राप्त मिळणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु एक महिना लोटूनही अहवाल आला नाही. यासंदर्भात सदर प्रतिनिधीने सहायक संचालक सुरेश कुकडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, लवकरच अहवाल उपलब्ध केला जाणार असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा
४सन २०१५ या सत्रात आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान येथील प्राध्यापकांनी घोळ करून कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश दिला. यात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या तीन प्राध्यापकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बनावट
४या संस्थेत ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश संशयाच्या भोवऱ्यात असले तरी यातील १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्णत: बोगस तर १३ विद्यार्थ्यांना सदर संस्थेत प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही त्यांचे प्रवेश प्रक्रियेदरम्यान मूळ कागदपत्र कार्यालयातून गहाळ झाल्याची विश्वासनीय माहिती सूत्राने दिली. हे प्रकरण गंभीर असूनही सहसंचालकांनी दोषींविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही.
माहिती देण्यास प्राचार्यांचा नकार
विद्यार्थ्यांना बनावट प्रवेश दिल्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. सहसंचालकाडून अहवाल येताच माहिती उपलब्ध होईल. त्यानंतर आपल्याला माहिती देण्यात येईल.
- अनिल कदम,
प्राचार्य, आयटीआय लाखांदूर.