आता घरांना मिळणार युनिक नंबर
By Admin | Updated: February 21, 2016 00:23 IST2016-02-21T00:23:58+5:302016-02-21T00:23:58+5:30
आधार कार्डच्या नंतर आता प्रत्येक घराला एक युनिक क्रमांक देण्याची योजना सुरू होत आहे.

आता घरांना मिळणार युनिक नंबर
केंद्र शासनाचा उपक्रम : जिल्ह्यात पवनी येथून अभियानाला प्रारंभ
पवनी : आधार कार्डच्या नंतर आता प्रत्येक घराला एक युनिक क्रमांक देण्याची योजना सुरू होत आहे. केंद्र सरकारचा हा नवीन उपक्रम अभियान अंमलात येत आहे.
यासंदर्भात बंगले, घर, हॉटेल, झोपड्या, दुकाने यांची मोजणी होणार असून केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालय व मुख्य निवडणूक आयोग यांच्यामार्फत हे अभियान राबविण्यात येत असून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्याला मिळणार कोड नंबर
वाहनाच्या पासिंग क्रमांक करीता भंडारा जिल्ह्यात एमएच-१८ हा क्रमांक दिला जातो. परंतु घराच्या सर्वेक्षणकरीता जिल्हाला एमएच-० क्रमांक दिला जाईल. येणाऱ्या काही दिवसात जिल्ह्यात घराच्या सर्वेक्षणाचे कामाला सुरूवात होत आहे.
पवनीत नगराध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ
या सर्वेक्षणाचे शुभारंभ पवनीचे नगराध्यक्षा तसेच उपाध्यक्ष यांचे हस्ते १८ फेब्रुवारी २०१६ ला झाले असून सदर वेळी पवनी नगरपरिषदेचे सदस्य, सदस्या गण उपस्थित होते. यावेळी कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी पियुष भजे यांनी योजनेची माहिती दिली.
युनिक क्रमांकाचे फायदे कसे असणार
आधारकार्डनंतर आता प्रत्येक घराला मिळणार युनिक क्रमांक याचा उपयोग जनगणना, निवडणूक, डाक विभाग, विद्युत वितरण, पोलीस प्रशासन, कृषी विभाग, न्यायालय, रोजगार ई-२१ विभागामध्ये उपयोगात येणार.
घराला लागेल लोखंडाची प्लेट
सर्वेक्षणानंतर घराला एक लोखंडाची प्लेट लावण्यात येणार. यावर घराचा युनिक क्रमांक लिहिला असेल. सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तींकडे त्यांचे ओळखपत्र असेल. यासाठी प्रत्येक घराकडून २० रूपये शुल्क आकारले जाणार.
पवनी येथून झाली सुरूवात
या सर्वेक्षण अभियानाच्या पहिल्या टप्प्यांचे शुभारंभ भंडारा जिल्ह्यातील पवनी या शहरातून झाला असून नगरपालिका, महानगरपालिका विभागानंतर ग्रामीण भागांत प्रत्येक गावात हे सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या विशिष्ट फार्ममध्ये नोंदणीसाठी कुटूंब प्रमुखाचा आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, घराची स्थिती, शिक्षण, नौकरी, व्यवसाय ईत्यादींची माहिती घेवून केंद्र सरकारला पुरविली जाईल. हे कार्य सेंट्रल कमर्शियल इंडस्ट्री आॅफ इंडिया या कंपनीला सोपविले आहे.